अन्यायाविरोधात आवाज उठवत रहा, आम्ही तुमच्या पाठीशी! शाळकरी मुलींच्या धाडसाला आदित्य ठाकरे यांची कौतुकाची थाप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोंगदिवडे-खांडपे येथील शाळकरी मुलींनी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात उठवलेल्या आवाजाची शिवसेना नेते युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली. नेहा बारे, ज्योत्स्ना मुकणे आणि मानसी पवार या विद्यार्थिनींशी मोबाईलवरून संवाद साधत त्यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. सत्ताधारी असोत की विरोधक त्यांच्या अन्याय्य कारभाराविरोधात आवाज उठवलाच पाहिजे, असे सांगतानाच यापुढे दमदाटी अथवा त्रास झाला तर आम्हाला सांगा, शिवसेना, युवासेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा शब्द त्यांनी दिला.

कोंगदिवडे-खांडपे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले होते. सत्ताधारी आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर नेहा बारे, ज्योत्स्ना मुकणे आणि मानसी पवार या विद्यार्थिनींनी ‘ग्राउंड रिपोर्टिंग’ केले. छत्रीचा बूम आणि मोबाईल कॅमेरा घेत खड्डे कॅमेऱ्यात कैद केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे खडबडून जागे झाले. त्यांनी हे खड्डे बुजवू असे बाईट दिले. त्यापाठोपाठ सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली. गावातील तीन शाळकरी मुलींनी केलेल्या या छोट्याशा ‘मीडिया रिपोर्ट’ने अख्खे प्रशासन हलवले. या शाळकरी मुलींच्या धडाकेबाज रिपोर्टिंगची दखल घेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेची कोअर कमिटी आज कर्जत येथील मुलींच्या घरी पोहोचली. या कमिटीने मुलींचे आणि पालकांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. या टीमने आदित्य ठाकरे यांच्याशी या मुलींचे मोबाईलवरून बोलणे करून दिले. यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य अभिषेक शिर्के, सिद्धेश शिंदे, अश्विनी पवार, उपसचिव रणजित कदम, विस्तारक बाळा लोकरे, वरद सावंत, श्रुतिका कदम, सहसचिव जसप्रित सिंग-वडेरा तसेच कर्जत तालुका ॲड. संपत हडप, विधानसभा अधिकारी कल्पेश खडे, पंकज म्हसे, चेतन गुरव, प्रशांत शाह, केतन देशमुख, परशुराम लोबो आणि योगेश थोरवे यांच्यासह युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.