दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेआधी यशस्वी जयस्वालचं शानदार शतक, पण अजूनही एक मोठा प्रश्न उपस्थित?
सलामीवीर यशस्वी जयस्वालने (Yashsvi jaiswal) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी दमदार तयारी केली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या रणजी सामन्यात राजस्थानविरुद्ध मुंबईसाठी खेळताना त्याने जबरदस्त शतक झळकावलं. हे जयस्वालच्या या कारकिर्दीतील 17 वं फर्स्ट क्लास शतक आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अर्धशतकावर नाबाद परतलेल्या यशस्वी जयस्वालने चौथ्या दिवशी 120 चेंडूत शतक पूर्ण केलं. जानेवारी 2025 नंतरचा हा त्याचा पहिला रणजी सामना होता.
2019 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून रणजीमध्ये जयस्वालचं हे पाचवं शतक आहे, जे फक्त 21 डावांत आलं आहे. राजस्थानविरुद्धच्या या खेळीत त्याने मुंबईसाठी रणजीतील 1000 धावाही पूर्ण केल्या. रणजीमध्ये त्याची सर्वसाधारण सरासरी 57 च्या आसपास आहे.
राजस्थानने पहिल्या डावात 617 धावा करून मुंबईवर 363 धावांची आघाडी घेतली होती. दीपक हूडाने 248 धावांची जबरदस्त खेळी केली. पहिल्या डावात 254 धावा करणाऱ्या मुंबईने तिसऱ्या दिवशी अखेरपर्यंत कोणतीही विकेट न गमावता 89 धावा केल्या होत्या.
सामन्याच्या अखेरच्या दिवशी यशस्वी जयस्वालने 174 चेंडूत 156 धावा ठोकल्या, ज्यामुळे मुंबईने 3 विकेट्सवर 269 धावा केल्या. त्याच्या खेळीत 18 चौकार आणि 1 षटकार होता. त्याने मुशीर खानसोबत (115 चेंडूत 63 धावा) 149 धावांची भागीदारी केली, तर सिद्धेश लाड (नाबाद 19) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 67 धावा जोडल्या.
यशस्वी जयस्वाल सातत्याने धावा करत आहे, पण मोठा प्रश्न अजूनही कायम आहे, हा फलंदाज भारताच्या वनडे आणि टी20 संघात नियमित खेळाडू बनेल का? यशस्वी जयस्वालने 2023 मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केलं आणि आतापर्यंत 26 कसोटी सामने खेळले आहेत. त्याच काळात त्यांनी टी20 मध्येही पदार्पण केलं, पण अजूनपर्यंत फक्त 23 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याचा टी20 स्ट्राइक रेट 164.34 एवढा आहे, तरीही तो टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नियमित नाही.
सध्या अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल (Abhishek Sharma & Shubman gill) ही जोडी भारतासाठी टी20 मध्ये सलामी देते. त्यामुळे यशस्वी जयस्वालला पुढील काळात संधी मिळेल का, हा प्रश्न चर्चेत आहे. तसेच वनडे संघात त्याला कधी स्थान मिळेल हेही पाहणं रंजक ठरेल. आत्तापर्यंत जयस्वालने भारतासाठी फक्त एक वनडे सामना खेळला आहे. सध्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल वनडे ओपनिंग करतात, त्यामुळे निवड समिती हा डावखुरा फलंदाज या फॉरमॅटमध्ये कसा बसवते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Comments are closed.