काश्मीर विधानसभेत आमदारांमध्ये बाचाबाची

भाजप-काँग्रेस आमदार भिडले : इराणच्या समर्थनार्थही उठवला आवाज

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीर विधानसभा सभागृहात काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये झटापट झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. या झटापटीचा एक व्हिडिओ शुक्रवारी समोर आला. हा वाद भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर केलेल्या टिप्पणीवरून झाला होता. काँग्रेसचे आमदार इरफान हाफिज हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. याला प्रत्युत्तर म्हणून भाजप आमदार युधवीर सेठी यांनी राहुल गांधी यांना पप्पू असे संबोधल्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये झटापट झाली. एकीकडे भाजप-काँग्रेस आमदारांमध्ये वादावादी झाली असतानाच काही आमदारांनी इराणच्या समर्थनार्थ सभागृहात आवाज उठवला. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाच्या निषेधार्थ शुक्रवारी जम्मू काश्मीर विधानसभेत आंदोलन सुरू झाले. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते खामेनी यांचा फोटो घेऊन आणि समर्थनार्थ घोषणा देत सभागृहात दाखल झाले. नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी खामेनी यांचे पोस्टरही फडकवले.

इराण युद्धाबाबत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘ज्या पद्धतीने हे युद्ध इराणवर लादले गेले, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. ज्या पद्धतीने मानवतेची हत्या करण्यात आली आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी आणि जवळच्या नातेवाईकांची हत्या झाली, त्यासाठी कितीही निषेध केला तरी तो कमीच ठरेल.’ असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार तनवीर सादिक यांनीही आपण इराणच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. आमचा पक्ष आणि जम्मू काश्मीर सरकार त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments are closed.