मूर्तिकारांचा अखेरचा हात, बाजारात तुफान गर्दी; प्रशासन सज्ज, रायगडात १ लाख बाप्पा होणार विराजमान
लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनास फक्त आठवडा उरला असून आतापासूनच रायगड जिल्ह्यात भक्तांची लगबग सुरू झाली आहे. यंदा जिल्ह्यात १ लाख ५ हजार ३४५ बाप्पा विराजमान होणार आहेत. त्यात १ लाख ५ हजार ५४ घरगुती गणपतींचा तर २९१ गणरायांची सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात प्रतिष्ठापना होणार आहे. रायगडातील बाजारपेठा मखरांनी तसेच पूजेच्या साहित्यांनी सजल्या असून खरेदीसाठी गर्दी झाली आहे. मूर्तिकार अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. यंदाचा गणेशोत्सव हा धूमधडाक्यात साजरा होणार असून प्रशासनदेखील सज्ज झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील घरोघरी सध्या रंगरंगोटी आणि सजावटी सुरू आहेत. बच्चेकंपनीपासून ते आजीआजोबांपर्यंत सगळेजण गणरायाची आतुरतेने वाट पाहात आहेत. बाप्पाचे आगमन जल्लोषात व्हावे यासाठी ढोलताशेदेखील तयारीत आहेत. रायगडातील गणपतींच्या कारखान्यांमध्ये कलाकार दिवस-रात्र काम करत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः पेणमधील प्रसिद्ध गणपती घरी नेण्यासाठी भक्त आतूर झाले आहेत. बाप्पाचे आसन, कंठीमाळ, मखर, प्रसादाचे व सजावटीचे साहित्य खरेदी करण्याची धावपळ आतापासूनच सुरू झाली आहे.
सोशल मीडियावरही बाप्पा मोरया रे..
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत असतानाच भक्तांनी आता सोशल मीडियावरही बाप्पा मोरया रेऽऽ.. चा गजर सुरू केला आहे. अनेकांनी आपल्या घरच्या गणपतीचा डीपी व्हॉट्सअॅप व फेसबुकवर ठेवला आहे. त्याशिवाय पूजेसाठी गुरुजींचे ऑनलाइन बुकिंग आतापासूनच फुल्ल झाले आहे.
रायगडातील गणेशोत्सव दिमाखात व शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेतल्या असून त्यांना आवश्यक त्या सूचनाही पोलीस अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
ऐन उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव दलाच्या तुकड्या तसेच होमगार्डदेखील राहणार आहेत. त्यांच्या नेमणुकाही करण्यात आल्या आहेत. सजावटीसाठी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकच्या माळा बाजारात आल्या असून अगरबत्ती, धूप, कापूर, अत्तर, आरती संग्रह आदी पूजेचे साहित्य उपलब्ध झाले आहे.
Comments are closed.