एसडीपीआयचे अध्यक्ष फैझी यांना अटक केली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सोशल डेमॉव्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष एम. के. फैझी यांना प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) अटक केली आहे. त्यांच्यावर मनी लाँडरिंगचा गुन्हा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दिल्लीत मुख्यालय असलेला हा राजकीय पक्ष बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित आहे, असाही आरोप केला जात आहे.
फैझी हे देशाबाहेर जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, सोमवारी रात्री उशीरा त्यांना दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. मनी लाँडरिंग विरोधी कायद्याच्या विविध तरतुदींच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. हा राजकीय पक्ष पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेची राजकीय शाखा आहे, असाही आरोप ईडीकडून ठेवण्यात आला आहे. या संघटनेवर केंद्र सरकारने सप्टेंबर 2022 मध्ये या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली होती. ही संघटना बेकायदेशीर आणि धोकादायक असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
संयुक्तरित्या धाडी
या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालण्याआधी ईडी, एनआयए आणि अनेक राज्यांचे पोलिस यांनी या संघटनेच्या अनेक कार्यालयांवर देशव्यापी धाडी टाकल्या होत्या. अनेक महत्वाची कागदपत्रे आणि इतर साधनसामग्री या धाडींमध्ये हस्तगत करण्यात आली होती. तथापि, एसडीपीआय या राजकीय पक्षाने या संघटनेशी आपला संबंध असल्याच्या आरोपाचा इन्कार केला असून आपला स्वतंत्र पक्ष असल्याचे प्रतिपादन केले आहे. फैझ यांच्या चौकशीतून हा राजकीय पक्ष, त्याचे आर्थिक व्यवहार आणि त्याचे लागेबांधे यांच्यावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
दोन राज्यांमध्ये प्रभाव
एसडीपीआय आणि बंदी घालण्यात आलेली संघटना पीएफआय यांचा केरळ आणि कर्नाटकातील अनेक पॉकेटस्मध्ये मोठा प्रभाव असल्याचे दिसून आले आहे. तसेच दक्षिण भारतातील अन्य काही राज्यांमध्येही काही स्थानी या संघटना कार्यरत असल्याची माहिती गुप्तचरांनी केंद्र सरकारला दिलेली आहे. त्यानंतरच केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदीची घोषणा केली होती.
Comments are closed.