द्रमुक आणि काँग्रेसमध्ये जागावाटप निश्चित झाले
तामिळनाडूत काँग्रेस 28 जागा लढविणार : द्रमुककडून राज्यसभेची एक जागा मिळणार
वृत्तसंस्था/चेन्नई
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी द्रमुक आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. द्रमुकने काँग्रेसकरता 28 जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. याचबरोबर काँग्रेसला राज्यसभेची एक जागाही द्रमुकने दिली आहे. द्रमुक अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि तामिळनाडू काँग्रेस समितीचे अध्यक्ष के. सेल्वपेरुंथगई यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात विधानसभेच्या 234 जागा आहेत. 2021 च्या निवडणुकीत द्रमुकने 133 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 18 जागा मिळाल्या होत्या. द्रमुकच्या नेतृत्वातील आघाडीने एकूण 159 जागांवर विजय मिळविला होता. दुसरीकडे रालोआला 75 जागा मिळाल्या होत्या,
ज्यात अण्णाद्रमुक हा 66 जागांसोबत आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यंदाच्या निवडणुकीकरता काँग्रेस आणि द्रमुक यांच्यात 2004 पासून चाल आलेली आघाडी तुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु काँग्रेसचे वरिष्ठ नेते. पी. चिदंबरम यांनी मंगळवारी द्रमुक अध्यक्ष स्टॅलिन यांची भेट घेत दीर्घ चर्चा केल्यावर सहमती निर्माण होऊ शकली. काँग्रेसने जागांची संख्या वाढविण्याची मागणी केली होती. काँग्रेसला या मागणीला द्रमुकने फेटाळले होते. जागावाटप निश्चित होत नसल्याने काँग्रेस नेतृत्वाकडून चिदंबरम यांना चर्चेसाठी चेन्नई येथे पाठविण्यात आले. स्टॅलिन यांची काँग्रेसला 25 जागा सोडण्याची तयारी होती. परंतु चिदंबरम यांच्यासोबतच्या चर्चेनंतर स्टॅलिन यांनी 28 जागांकरता सहमती दर्शविली.
पक्षनेतृत्व, कार्यकर्ते आनंदी : सेल्वपेरुंथगई
आमच्या पक्षाला राज्याच्या निवडणुकीकरता 28 जागा मिळाल्या आहेत. 40 वर्षांनी आम्हाला 3 अतिरिक्त जागा आणि राज्यसभेत एक जागा मिळाली आहे. पक्ष याचे स्वागत करतो. तामिळनाडूच्या जनतेला या आघाडीची गरज आहे. या निर्णयामुळे पक्षनेतृत्व आणि काँग्रेस कार्यकर्तेही आनंदी आहेत. आगामी निवडणुकीत आमची आघाडी 210 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के. सेल्वपेरुंथगई यांनी केला आहे.
Comments are closed.