IPL 2026: दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर; 12 शहरांमध्ये रंगणार सर्व सामने

बीसीसीआयकडून आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या टप्प्याचे (Phase 2) वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. या टप्प्यात एकूण ५० सामन्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यासाठी २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. लीगचे उर्वरित सामने १३ एप्रिलपासून २४ मे पर्यंत खेळवले जातील. यासाठी १२ स्टेडियमची निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील सामने बेंगळुरू, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, धर्मशाला, रायपूर आणि न्यू चंदीगड येथे आयोजित केले जाणार आहेत. यापूर्वी बीसीसीआयने केवळ २० सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा केली होती.

​१३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात ८ ‘डबल हेडर’ (एकाच दिवशी दोन सामने) सामने खेळले जातील. याचा अर्थ असा की, चाहते ८ दिवस आयपीएलच्या दोन सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल, तर दुसरा सामना संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. सामना सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरतील.

​दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक समोर आल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, पंजाब किंग्सचा संघ आपले घरचे सामने (Home Matches) न्यू चंदीगड आणि धर्मशाला येथील मैदानावर खेळण्यासाठी उतरेल. या टप्प्यात हा संघ ३ सामने धरमशालाच्या सुंदर मैदानावर खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ आपले घरचे सामने जयपूरमध्ये खेळेल, तर आरसीबीचा संघदेखील दोन घरच्या मैदानांवर खेळताना दिसेल. आरसीबीचा संघ ३ सामने बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळेल, तर २ सामने रायपूरमध्ये खेळणार आहे.

Comments are closed.