टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शिवम दुबेने विमानाऐवजी का निवडली ट्रेन? स्वतः केला मोठा खुलासा!

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर (icc T20 international world cup 2026) संपूर्ण भारतीय संघ विजयाचा जल्लोष करत मायदेशी परतण्याची तयारी करत होता. मात्र, अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने (Shivam Dube) घेतलेल्या एका निर्णयाने सर्वांनाच चकित केले. अहमदाबादहून मुंबईला जाण्यासाठी त्याने विमानाऐवजी चक्क रेल्वेने (ट्रेन) प्रवास करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर या गोष्टीची खूप चर्चा झाली आणि आता स्वतः शिवमने यामागचे खास कारण सांगितले आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडला हरवून विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर काही तासांतच दुबे संघापासून वेगळा झाला. इतर खेळाडू विमानाने जाणार होते, पण दुबेला लवकरात लवकर घरी पोहोचायचे होते.

शिवम दुबेने सांगितले की, तो आपल्या लहान मुलाला आणि वडिलांना भेटण्यासाठी खूप व्याकुळ झाला होता. मला घरी पोहोचण्याची इतकी ओढ लागली होती की मी आणखी वाट पाहू शकत नव्हतो. म्हणूनच मी पहाटेच निघालो, असे त्याने स्पष्ट केले. अहमदाबादहून मुंबईसाठी विमानाचे तिकीट उपलब्ध नव्हते. रस्ते मार्गाने जाण्यापेक्षा ट्रेनचा प्रवास वेगवान होता, म्हणून त्याने पत्नी आणि एका मित्रासह 3-टियर एसी (3-Tier AC) कोचमध्ये सीट बुक केली आणि पहाटे 5 वाजताच्या ट्रेनने प्रवास सुरू केला.

विश्वचषक जिंकल्यानंतर लगेच सार्वजनिक ट्रेनमधून प्रवास करणे सोपे नव्हते. कोणाला ओळख पटली असती तर गर्दी होण्याचा धोका होता. त्यामुळे त्याचे कुटुंब आणि मित्रही काळजीत होते. पण दुबेने पूर्ण नियोजनासह हा प्रवास केला. ओळख लपवण्यासाठी त्याने टोपी (Cap), फेस मास्क आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घातले होते. स्टेशनवर गर्दी कमी असेल अशी पहाटेची वेळ त्याने निवडली. ट्रेन सुटण्याच्या फक्त 5 मिनिटे आधी तो कारमधून उतरला आणि थेट आपल्या डब्यात जाऊन बसला. अशा प्रकारे शिवम दुबेने आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी सर्व ग्लॅमर बाजूला सारून एका सामान्य प्रवाशासारखा प्रवास पूर्ण केला.

Comments are closed.