सुरक्षा परिषदेने पाकिस्तानला फटकारले
भारताला समर्थन, वाढत्या दहशतवादासंबंधी चिंता
वृत्तसंस्था / .नवी दिल्ली
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात पाकिस्तानलाच फटकारले आहे. परिषदेच्या बंद दरवाजाआड झालेल्या बैठकीत सोमवारी रात्री उशीर पहलगाम हल्ल्यासंबंधी चर्चा करण्यात आली. या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात आहे काय, अशी स्पष्ट विचारणा परिषदेने पाकिस्तानला केली आहे. त्यामुळे या परिषदेकडून आपल्याला समर्थन मिळेल ही पाकिस्तानची आशा अक्षरश: फोल ठरली आहे.
सुरक्षा परिषदेच्या बैठकीची मागणी खरेतर पाकिस्ताननेच केली होती. पाकिस्तान सध्या या परिषदेचा एक अस्थायी सदस्य आहे. पाकिस्तानच्याच विनंतीवरुन आयोजित झालेल्या या बैठकीत पाकिस्तानचीच प्रचंड कोंडी झाल्याचे दिसून आले आहे. सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी पाकिस्तानला अनेक थेट आणि स्पष्ट प्रश्न या बैठकीत विचारले. परिषदेने 22 एप्रिल या दिवशी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची निंदा करणारा प्रस्ताव संमत केला आहे.
परिषदेचे सदस्य संतप्त
पहलगाम हल्ल्यात पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या घालण्यात आल्या. यासंबंधी पाकिस्तानच्या प्रतिनिधीला सुरक्षा परिषदेच्या बैठकीत धारेवर धरण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धर्माच्या नावावर केलेल्या या हत्त्यांमुळे परिषदेचे अनेक सदस्य संतप्त झाल्याचे दिसत होते. त्यांनी पाकिस्तानच्या प्रतिनिधीला अनेक प्रश्न विचारुन स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.
पाकिस्तानचा फ्लॉप शो
ही बैठक पाकिस्तानच्याच मागणीवरुन आयोजित करण्यात आली होती. तथापि, या बैठकीकडून पाकिस्तानच्या ज्या आशा होत्या, त्या सर्व फोल ठरल्या आहेत. या बैठकीआधी भारताने सुरक्षा परिषदेच्या अनेक सदस्य देशांशी चर्चा केली होती. भारताचा पक्ष त्यांना योग्य रितीने समजावून देण्यात आला होता. त्यामुळे भारताच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा पाकिस्तानचा उद्देश पूर्णत: धुळीला मिळाला आहे. बैठकीतून पाकिस्तानला हात हलवत बाहेर यावे लागले आहे. हा पाकिस्तानला मोठा धक्का मानला जात असून भारताचा हा नैतिक विजय आहे.
तुणतुणे चालूच
सुरक्षा परिषदेच्या बैठकीत मोठा धक्का बसला असूनही पाकिस्ताने निर्लज्जपणाने काश्मीर प्रश्नावरचे आपले नेहमीचे तुणतुणे चालूच ठेवले आहे. काश्मीरी जनता तिच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत असून पहलगाम हल्ला हा या संघर्षाचाच एक भाग आहे, असा प्रछन्न प्रचार पाकिस्तानने अद्यापही चालविला आहे. बैठकीत सदस्यांनी सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना स्थिती आणखी चिघळू देऊ नका, असा सल्ला दिला आहे, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. तथापि, पाकिस्तान खोटी विधाने करत असल्याचे भारताचे म्हणणे आहे. भारतानेही पाकिस्तानला कानपिचक्या दिल्या आहेत.
पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचण्यांना आक्षेप
सुरक्षा परिषदेच्या या बैठकीत पाकिस्तानने नुकत्याच केलेल्या विविध क्षेपणास्त्र चाचण्यांवरही आक्षेप घेण्यात आला. पाकिस्तान अशा चाचण्या करुन चिथावणीखोर कृत्य करीत आहे. अशा चाचण्यांमुळे या भागात युद्धज्वर वाढीला लागत आहे. पाकिस्तान हेतुपुरस्सर प्रक्षोभक कृती करीत आहे. पाकिस्तानने भारताला अणुयुद्धाचीही धमकी दिली आहे. या धमकीचारही परिषदेत निषेध करण्यात आला. अशा धमक्यांमुळे वातावरण अधिकच तप्त होत आहे, याची पाकिस्तानला जाणीव करुन देण्यात आली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. एकंदरीत पहाता, सुरक्षा परिषदेच्या या बैठकीत पाकिस्तानचा फार मोठा अपेक्षाभंग झाला असून त्याची अवस्था ‘करायला गेलो एक आणि झाले भलतेच’ अशी आहे.
पाकिस्तानला मोठा धक्का
ड सुरक्षा परिषदेतल्या बैठकीत पाकिस्तानला बसला फार मोठा धक्का
ड पाकिस्तानची अणुधमकी आणि क्षेपणास्त्र चाचण्यांवर जोरदार आक्षेप
ड पहलगाम हल्ल्यात लष्कर ए तोयबाचा हात असल्यासंबंधी विचारणा
ड पाकिस्तानच्या कृतींमुळे वातावरण अधिकच तापत असल्याचा आरोप
Comments are closed.