आज देशभरातील 259 ठिकाणी सुरक्षा कवायती चालू आहेत

सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्याचाही समावेश

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव शिगेला पोहचल्याच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी भारतात 259 स्थानांवर सुरक्षा सरावाचे (मॉक सिक्युरिटी ड्रिल) आयोजन करण्यात आले आहे. या स्थानांमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि संपूर्ण गोवा राज्याचा समावेश करण्यात आला आहे. या सरावाच्या काळात विमान हल्ल्याची सूचना देणारे भोंगे, तत्काळ ब्लॅकआऊट आणि सर्वसामान्यांनी करावयाचे सुरक्षा उपाय यांचा समावेश आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धास प्रारंभ झालाच, तर त्या परिस्थितीत भारताचे जे भाग पाकिस्तानी वायुहल्ल्याच्या कक्षेत येऊ शकतात, अशा भागांपैकी काही भागांमध्ये हा सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेला कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करण्याचे प्रशिक्षण मिळावे आणि लोकांनी मानसिक सज्जता व्हावी, हा या सुरक्षा सरावाचा हेतू असल्याचे स्पष्ट केले गेले.

प्रतिसादाचे प्रशिक्षण देणार

विमान हल्ला किंवा क्षेपणास्त्र हल्ला यांची सूचना देणारे भोंगे (सायरन) वाजताच लोकांनी आणि प्रशासकीय यंत्रणांनी प्रतिसाद कसा द्यावा, सुरक्षेसाठी काय उपाययोजना करावी, स्वत:ला आणि आजूबाजूच्या लोकांच्या सुरक्षेसाठी काय करावे, याचे प्रशिक्षण आणि प्रबोधन या सरावातून केले जाणार आहे. स्थानिक प्रशासनांनी यासाठी सज्ज रहावे, असा आदेश केंद्रीय गृहविभागाने दिला आहे.

1971 नंतर प्रथमच

1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. हे युद्ध होण्यापूर्वी अनेकदा देशात अनेक स्थानी अशा प्रकारचा सराव आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर साडेत्रेपन्न वर्षांनी प्रथमच अशा प्रकारचा सराव देशभर आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आहे.

तीन श्रेणींमध्ये विभागणी

सुरक्षा सरावासाठी ज्या 259 स्थानांची निवड करण्यात आली आहे. त्या सर्व स्थानी एकाच पातळीवरचा सुरक्षा सराव केला जाणार नाही, अशीही माहिती देण्यात आली आहे. या स्थानांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली असून ज्या स्थानांना सर्वाधिक धोका संभवतो, तेथे अधिक कठोर प्रकारचा सुरक्षा सराव घेतला जाणार आहे, अशीही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाची बैठक

आज बुधवारी हा सराव होणार आहे. त्याआधी मंगळवारी केंद्रीय गृहविभागाचे सचिव गोविंद मोहन यांनी एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत या सुरक्षा सरावासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. स्थानिक प्रशासनांची या सरावासाठी सज्जता कितपत आहे, तसेच सरावाचे स्वरुप विविध स्थानी कोणत्या प्रकारचे असावे, यावरही बैठकीत विचारविमर्श करण्यात आला. विविध राज्यांचे नागरी सुरक्षा विभाग प्रमुख सचिवही या बैठकीला उपस्थित होते. 2010 मध्ये ज्या विशिष्ट 244 नागरी सुरक्षा जिल्हे निश्चित करण्यात आले होते. त्या जिल्ह्यांवर या सुरक्षा सरावात विशेष भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बॅटरी, मेणबत्त्या आणि रोख रक्कम

ज्या भागांमध्ये सुरक्षा सराव होणार आहे, त्या भागांमधील लोकांना स्वत:जवळ बॅटरी (टॉर्च), मेणबत्त्या आणि रोख रक्कम जवळ ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. ब्लॅकआऊटच्या काळात जेव्हा संपूर्ण भागातील वीजपुरवठा बंद केला जाईल, तेव्हा टॉर्च किंवा मेणबत्त्या उपयोगी येतील. त्यांचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा याच्याही सूचना दिल्या जाणार आहेत. ब्लॅक आऊटच्या काळात शक्यतर लोकांनी घरांमधून बाहेर पडू नये, अशी सर्वसाधारण पद्धत आहे. 1971 मध्येही असा सराव झाला होता, त्याच्या आठवणी या निमित्ताने जागृत होत आहेत.

महाराष्ट्रातील स्थाने कोणत्या श्रेणींमध्ये…

गोव्याचा समावेश सरावाच्या द्वितीय श्रेणीत करण्यात आला आहे. उत्तर गोव्यातील पणजी आणि दक्षिण गोव्यातील मार्मागोवा, दाबोली आणि बंदर यांचा समावेश या श्रेणीत करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश सरावाच्या तिसऱ्या श्रेणीत करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. याखेरीज महाराष्ट्रातील मुंबई, उरण आणि तारापूर यांचा समावेश प्रथम श्रेणीत आहे. पुणे, ठाणे, नाशिक, ऱ्होण, धताव, नागोठाणे, मनमाड, सिन्नर, थळ वायशेत आणि पिंपरी-चिंचवड यांचा समावेश दुसऱ्या श्रेणीत आहे. संभाजीनगर (औरंगाबाद), भुसावळ आणि रायगड यांचा समावेश तिसऱ्या श्रेणीत आहे.

कर्नाटकातली स्थाने कोणत्या श्रेणींमध्ये…

कर्नाटकातील तीन स्थानांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यात बेंगळूर (शहर), मल्लेश्वरम आणि रायचूर यांचा समावेश असून ही सर्व स्थाने सरावाच्या दुसऱ्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त कर्नाटकातील कोणतेही स्थान या सूचीत नसल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे

Comments are closed.