सुरक्षा पुनरावलोकन बैठका पूर्ण स्विंग
राजनाथ सिंग यांची प्रथम लष्करप्रमुखांशी, नंतर पंतप्रधानांशी चर्चा : पहलगाम हल्ल्याबाबत संसदीय समितीचीही बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सोमवारी सात दिवस पूर्ण झाले. या हल्ल्यानंतर भारत पूर्णपणे अलर्ट मोडवर असून हल्ला घडवणाऱ्यांना अद्दल घडवण्याची तयारी सुरू आहे. दिल्लीपासून श्रीनगरपर्यंत वेगवेगळ्या पातळीवर सज्जतेची चाचपणी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्त्वात बैठकांचा सपाटा सुरू असून सर्व यंत्रणांमध्ये रितसर समन्वय सुरू असल्याचे दिसत आहे. राजनाथ सिंग यांची सोमवारी पंतप्रधान मोदींशी 40 मिनिटे बैठक झाली. या बैठकीतील माहिती माध्यमांना देण्यात आली नसली तरी पाकिस्तानविरुद्ध मोठा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, संसदेच्या संरक्षण व्यवहारांवरील संसदीय स्थायी समितीची बैठक संसदेच्या अॅनेक्स इमारतीत एक तास चालली.
गेल्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकते असे मानले जात आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच ठेवले आहे. या गोळीबाराला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. याचदरम्यान, जम्मू काश्मीर विधानसभेत बोलावलेल्या विशेष अधिवेशनात पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या 7, लोक कल्याण मार्ग येथील सरकारी निवासस्थानी पोहोचले होते. संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींशी दीर्घ चर्चा केली. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी झालेल्या 40 मिनिटांच्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते. राजनाथ सिंग यांनी पंतप्रधानांना ताज्या परिस्थितीची माहिती दिली आहे.
संरक्षण व्यवहार संसदीय स्थायी समितीची बैठक
संरक्षण व्यवहारांवरील संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत काही मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. या समितीचे अध्यक्ष राधामोहन सिंह आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील बैठकीला पोहोचले होते. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला तोंड देण्यासाठी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती सीडीएस अनिल चौहान यांनी संरक्षणमंत्र्यांना दिल्यानंतर एका दिवसानंतर ही बैठक झाली.
पाकिस्तानने नाकारला निर्णय
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवितरण करार स्थगित करण्याची घोषणा केली आहे. मात्र, पाकिस्तानने भारताच्या निर्णयाला विरोध केला असून पाणी अडविल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला आहे. तथापि, या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन भारताने पाकिस्तानचे पाणी अडविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यास प्रारंभ केला आहे. हा निर्यय तीन टप्प्यांमध्ये लागू केला जाणार आहे.
पाकिस्तान युद्धसज्ज आहे काय?
पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास युद्ध भडकेल, असा इशारा पाकिस्तानने दिला आहे. मात्र, हे पाकिस्तानचे उसने अवसान आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. अशावेळी पूर्ण युद्ध झाल्यास भारत ते पेलू शकेल, पण पाकिस्तानला ते सहन होणार नाही, अशी मांडणी पाकिस्तानातील तज्ञच करीत आहेत. तसेच सिंधू जलकरारासंबंधी निर्णय भारताने गांभीर्याने लागू केला, तर येत्या तीन ते चार वर्षांमध्येच पाकिस्तानमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते, असाही इशारा देण्यात आला आहे. हा धोका केवळ पाणी कमी होण्याचा नाही. तर भारताने पूर्वसूचना न देता आपल्या धरणांमधून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यास पाकिस्तानमध्ये पूर येऊन हानी होऊ शकते, असेही अनेक जाणकारांचे मत आहे. दोन दिवसांपूर्वी भारताने झेलम नदीवरील धरणातून अचानक पाणी सोडल्याने पाकिस्तानात अनेक स्थानी पूर आला होता.
Comments are closed.