आत्मनिर्भरता ही भारताची धोरणात्मक गरज आहे

दिल्ली डिफेन्स डायलॉगमध्ये नौदलप्र्रमुखांचा आत्मनिर्भरतेवर भर : जागतिक संघर्ष अन् वाढत्या संरक्षण खर्चाचा उल्लेख

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जागतिक संघर्ष आणि संरक्षणावरील वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता ही केवळ महत्त्वाकांक्षा नसून धोरणात्मक गरज असल्याचे नौदलप्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी सांगितले. दिल्ली डिफेन्स डायलॉग 2026 मध्ये बोलताना त्यांनी भारतीय नौदलाच्या भविष्यातील तयारीसाठी स्वदेशी क्षमता विकसित करण्यावर भर दिला.

स्वामीनाथन यांच्या मते, 2025 मध्ये जगाने संघर्षांवर सुमारे 21.8 ट्रिलियन अमेरिकी डॉलर खर्च केले. हा खर्च जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) सुमारे 10.5 टक्के असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक देश शस्त्रास्त्रांवरील खर्च वाढवत असून युद्धे आणि संघर्ष हे सध्याच्या भू-राजकारणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्या बनले आहेत.

2047 पर्यंत सक्षम आणि स्वावलंबी नौदलाचे लक्ष्य

भारत आणि भारतीय नौदलाने आत्मनिर्भर होणे आवश्यक असल्याचे नौदलप्रमुख म्हणाले. 2047 पर्यंत बाह्य मदतीवरील अवलंबित्वाशिवाय युद्ध करण्यास, ते सुरू ठेवण्यास आणि बदलत्या परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घेण्यास सक्षम नौदल उभारण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नौदलाची साधने आणि कार्यक्षमता स्वदेशी क्षमतांवर आधारित असणे गरजेचे आहे. बाह्य घटकांमुळे नौदलाच्या परिचालन क्षमतेवर परिणाम होऊ नये, यासाठी आत्मनिर्भरता महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.