सैन्यासाठी स्वावलंबी भारत आवश्यक आहे
सैन्यप्रमुख द्विवेदी यांचे वक्तव्य : विदेशी शस्त्रास्त्रांवर कायमस्वरुपी निर्भर राहणे चुकीचे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सैन्यासाठी देखील आत्मनिर्भर भारत आवश्यक आहे. पूर्वी संघर्षावेळी 100 किलोमीटरचा पल्ला असलेल्या शस्त्रास्त्रांची गरज असायची, तर आता 300 किलोमीटरचा मारक पल्ला असलेल्या शस्त्रास्त्रांची आवश्यकता असल्याचे वक्तव्य सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना केले आहे.
आमच्या शत्रूंचे तंत्रज्ञान देखील प्रगत होत असल्याने आम्ही विदेशी शस्त्रास्त्रांवर कायमस्वरुपी निर्भर राहू शकत नाही. स्वत:च्या क्षमतेवरील विश्वास सातत्याने मजबूत होणेच आम्हाला भविष्यातील युद्धासाठी तयार करू शकते असे उद्गार सैन्यप्रमुखांनी काढले आहेत.
ऑपरेशन सिंदूरसंबंधी काही लोकांनी हे तर 4 दिवसांची टेस्ट मॅच असल्याचे म्हटले. परंतु तुम्ही युद्धाविषयी काहीच अगोदर बोलू शकत नाही. हे ऑपरेशन किती दिवस चालेल याचा कुठलाच अंदाज आम्हाला नव्हता. युद्ध नेहमीच अनिश्चित असते. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले तेव्हा हे इतके दीर्घकाळ लांबेल याचा कुणालाच अंदाज नव्हता. इराण-इराक युद्ध जवळपास 10 वर्षे चालले होते असे सैन्यप्रमुखांनी म्हटले आहे.
भविष्याची तयारी
आगामी काळात नवे तंत्रज्ञानयुक्त शस्त्रास्त्रांना सैन्यात सामील करण्याची गरज आहे. भारत शस्त्रास्त्रांप्रकरणी रायफलपासून लेझर अस्त्रांपर्यंत पोहोचू इच्छितो. मानवरहित संचालित होणारे रणगाडे आम्ही सैन्यात सामील करत आहोत. सैन्यासाठी नव्या हेलिकॉप्टर्सच्या खरेदीवरही चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी मी विदेश दौऱ्यावर गेलो होतो. आम्ही सैनिकांचे जीवन अधिक चांगले करण्यावर जोर देत आहोत असे सैन्यप्रमुख द्विवेदी यांनी नमूद केले.
पुन्हा संघर्षाची शक्यता
यापूर्वी सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 4 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात पाकिस्तानसोबत पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली होती. पुढील युद्ध लवकरच होऊ शकते. यामुळे आम्हाला त्यानुसार तयारी करावी लागेल आणि यावेळी आम्हाला ही लढाई मिळून लढावी लागणार असल्याचे द्विवेदी यांनी आयआयटी मद्रासमध्ये ‘अग्निशोध’ इंडियन आर्मी रिसर्च सेलच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना म्हटले हेते. ऑपरेशन सिंदूरदरम्यान सरकारने आम्हाला पूर्ण मोकळीक दिली होती असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
Comments are closed.