सेमीफायनलचे गणित आणि टीम इंडियाचे लक्ष; झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधीच ठरणार भवितव्य!

सुपर ८ मध्ये टीम इंडियाला आपला पुढचा सामना २६ फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचा आहे. भारतीय संघाला जर जेतेपद राखण्यासाठी (Title Defend) सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की करायची असेल, तर या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागेल. २६ फेब्रुवारी रोजी स्पर्धेत एक नव्हे तर २ सामने खेळवले जाणार आहेत. टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना रात्री होणार आहे, तर त्याआधी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना दिवसा खेळवला जाईल. या सामन्यावर टीम इंडियाचे लक्ष असणार आहे, असे का आहे ते जाणून घेऊया.

​दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात टीम इंडियाची इच्छा असेल की दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करावा. यामुळे टीम इंडियासाठी सेमीफायनलचा मार्ग सोपा होईल. जर वेस्ट इंडिजच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, तर टीम इंडियासाठी नेट रन रेटच्या अडचणी निर्माण होतील. हा सामनादेखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिजने सुपर ८ च्या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव करून नेट रन रेटमध्ये मोठी झेप घेतली आहे आणि ते अव्वल स्थानावर विराजमान झाले आहेत.

​टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर भारतीय संघाची हीदेखील इच्छा असेल की, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुपर ८ मधील आपले सर्व सामने जिंकावेत, अन्यथा पात्रतेचे (Qualification) गणित बिघडू शकते. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरली आहे. २०२४ मध्ये संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती.

Comments are closed.