सेंगोलचे शिल्पकार वुम्मीदी इथिराजुलू यांचे निधन
पंतप्रधान मोदींसह तामिळनाडूच्या राज्यपालांकडून श्रद्धांजली
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताच्या स्वातंत्र्याच्या काळात ऐतिहासिक सेंगोलच्या (राजदंड) निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वुम्मिदी एथिराजुलू यांचे बुधवारी वृद्धापकाळाने येथे निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 99 वर्षे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
वुम्मिदी एथिराजुलू यांच्या कुटुंबीयांनी 75 वर्षांपूर्वी संसदेत स्थापित केलेला सेंगोल बांधला होता. सेंगोल म्हणजेच राजदंड हा भारतीय सम्राटाच्या सामर्थ्याचे आणि अधिकाराचे प्रतीक होता. वुम्मिदी एथिराजुलू यांनी वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी 1947 साली पवित्र सेंगोलच्या उभारणीत ऐतिहासिक भूमिका बजावली. सेंगोल हे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे, न्यायपूर्ण शासनाचे आणि स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर झालेल्या सत्ता हस्तांतरणाचे एक कालातीत प्रतीक आहे. सेंगोल हा शब्द ‘सेम्मई’ या तमिळ शब्दावरून आला असून त्याचा अर्थ नीतिमत्ता, सत्य आणि निष्ठा असा होतो. 2023 मध्ये केंद्र सरकारकडून नवीन संसद भवनात ‘सेंगोल’ला मानाचे स्थान दिल्यानंतर वुम्मिदी एथिराजुलू यांचाही सन्मान करण्यात आला होता.
Comments are closed.