भाजपचे ज्येष्ठ नेते बलबीर पुंज यांचे निधन
वृत्तसंस्था/ नोएडा
लेखक, माजी राज्यसभा खासदार आणि भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष बलबीर पुंज यांचे शनिवारी रात्री नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात निधन झाले. त्यांना शुक्रवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी दुपारी 12:30 वाजता दिल्लीतील निगंबोध घाटावर अंत्यविधी पार पडले.
दिवंगत नेते बलबीर पुंज हे 2000 ते 2006 या काळात उत्तर प्रदेशमधून आणि 2008 ते 2014 या काळात ओडिशामधून भाजपचे राज्यसभा खासदार म्हणून कार्यरत होते. बलबीर पुंज यांनी भाजपमध्ये अखिल भारतीय उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. पक्षाने त्यांची केरळ, पंजाब, गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांचे प्रभारी म्हणूनही नियुक्ती केली होती. त्यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या वृत्तपत्रे आणि मासिकांसाठी राष्ट्रीय राजकारण आणि आर्थिक विषयांवर स्वतंत्रपणे लेखन केले.
बलबीर पुंज नोएडाच्या सेक्टर 17 मध्ये राहत होते. त्यांची एक मुलगी परदेशात तर दुसरी दिल्लीत राहते. त्यांचा धाकटा भाऊ नोएडाच्या सेक्टर 47 मध्ये राहतो. अंतिम संस्कारांपूर्वी पार्थिव शरीर सेक्टर 47 मधील त्यांच्या भावाच्या निवासस्थानी नेण्यात आले होते.
बलबीर पुंज हे हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांतील एक निष्णात लेखक होते. राष्ट्रवादी विचारांमधील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांची गणना केली जात होती. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे निकटचे सहकारी असलेले बलबीर पुंज हे तरुण विजय, गुरुमूर्ती, अजित डोवाल आणि दिनानाथ मिश्रा यांसारख्या दिग्गजांच्या पंगतीत गणले जात होते.
Comments are closed.