वरिष्ठ क्रिकेटपटूंचा थेट गंभीर-आगरकरांशी पंगा! बीसीसीआयकडे भवितव्याबाबत विचारणा
गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांची मनमानी हिंदुस्थानच्या क्रिकेटमध्ये एवढ्या थराला पोहोचली आहे की, आता संघातील वरिष्ठ खेळाडूंना आपल्या भवितव्याबाबत चिंता वाटायला लागली आहे. त्यामुळे हिंदुस्थानचे वरिष्ठ क्रिकेटपटू आता गंभीर आणि आगरकर यांच्याशी पंगा घेत थेट बीसीसीआयच्या दारी पोहोचले आहेत. बीसीसीआयशी थेट संपर्क साधून या खेळाडूंनी आता आपल्या भवितव्याबाबत विचारणा केली आहे.
गंभीर व आगरकर यांनी पदावर आल्यानंतर हिंदुस्थानच्या वरिष्ठ खेळाडूंना थेट बाहेरचा रस्ता दाखवायला सुरुवात केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना याचा पहिला तडाखा बसला. मग जगज्जेत्या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव थेट टी-२० संघाबाहेर फेकला गेला. मोहम्मद शमी फॉर्मात असूनही त्याला संघात स्थान दिले नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये हिंदुस्थानकडून सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा टी-२० संघासाठी विचारच झाला नाही. त्यामुळे गंभीर व आगरकर हे वरिष्ठ खेळाडूंना जाणूनबुजून डावलत असल्याचे म्हटले जात आहे.
हिंदुस्थानच्या काही वरिष्ठ खेळाडूंनी एकत्र येऊन बीसीसीआयचे दार ठोठावले आहे. कारण जर स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करूनही जर भारताच्या संघात स्थान मिळत नसेल, तर नेमकं काय काय करायचं, हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. गंभीर आणि आगरकर यांनी वरिष्ठ खेळाडूंना त्यांच्या भवितव्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण प्रत्येकवेळा मात्र त्यांना संघाबाहेर ठेवले जात आहे. त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंनी थेट बीसीसीआयकडे धाव घेतली आहे. बीसीसीआयनेही हे प्रकरण गंभीरपूर्वक घेतले असून ते याबाबत निर्णय घेणार आहेत.
वरिष्ठ खेळाडूंना विश्वासात घ्यायला हवं!
‘ज्या वरिष्ठ खेळाडूंनी गेली बरीच वर्षे संघाची सेवा केली आहे, त्यांना चांगली वागणूक मिळायला हवी. वरिष्ठ खेळाडूंची यानंतर संघात काय भूमिका असेल, हे त्यांना सांगायला हवे, जेणेकरून त्यांना आपल्या भवितव्याबाबत योग्य ती माहिती मिळू शकते. सध्या गंभीर आणि आगरकर हे वन डे वर्ल्ड कपचा विचार करत असतील. पण ते करत असताना त्यांनी वरिष्ठ खेळाडूंशी स्पष्टपणे संवाद साधायला हवा, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.’
Comments are closed.