ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन, मृत्यूपश्चात देहदानाचा निर्णय

ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा (93) यांचे नळदुर्ग येथील आपल्या निवासस्थानी निधन झाले. शुक्रवारी रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांनी देहदान केले आहे.
पन्नालाल सुराणा मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी होते. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत ते सक्रिय होते.समाजवादी पक्ष आणि नंतर जनता पक्षाच्या वाटचालीत पक्षाचे राज्य सरचिटणीस म्हणून एस एम जोशी यांनी त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली होती. पन्नालाल सुराणा आणि त्यांच्या पत्नी डॉ वीणा सुराणा दोघेही अनेक सत्याग्रहात सहभाग नोंदवला होता. यादरम्यान त्यांना अनेक वेळा कारागृहात जावे लागले होते. मात्र पण आपल्या विचारांशी बांधिलकी त्यांनी सोडली नाही.
आयुष्यभर समाजवादी विचारांची पताका गौरवाने मिरवणारे, अनेक लोक चळवळीत सहभाग घेणारे, सत्तेच्या पदासाठी कधीही आग्रह न धरणारे, निस्पृह नि:स्वार्थी लोकनेता अशीच त्यांची ओळख होती. समाजवादी विचारांची ही धगधगती मशाल आज शांत झाली आहे ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचा देह छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दान केला आहे.

Comments are closed.