सर्जिओ गोर अमेरिकेचे राजदूत भारतात

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली तज्ञ अधिकाऱ्याची नियुक्ती

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्जियो गोर यांना भारतातील पुढील अमेरिकन राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. तसेच त्यांना दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहारांसाठी विशेष दूताची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. सर्जियो गोर हे मस्क आणि ट्रम्प यांच्यातील लढाई सुरू करणारे मानले जातात. तसेच सर्जियो हे बराच काळ ट्रम्प कुटुंबाचे विश्वासू असल्याचेही समजते. आता भारतात ‘अमेरिका फर्स्ट’चा अजेंडा पुढे नेण्यात गोर मोठी भूमिका बजावू शकतात असे मानले जाते. तसेच भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफवरून वाद सुरू असताना गोर यांना भारतात अमेरिकेचे राजदूत बनवण्यात येत आहे.

यापूर्वी सर्जियो गोर हे ट्रम्प यांच्याशी संबंधित कार्यक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी हाताळत हाते. ते ट्रम्प यांना कोण भेटू शकते आणि कोण नाही यावरही लक्ष ठेवत होते. म्हणूनच अमेरिकन मीडिया त्यांना ट्रम्प यांचा ‘गेटकीपर’ असे संबोधत होते. म्हणजेच ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर पहारेकऱ्यासारखा उभा राहणारा अधिकारी अशी त्यांची ओळख होती. राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांच्यासाठी निधी उभारण्यातही गोर यांनी मोठी भूमिका बजावली होती. ट्रम्प यांच्या टीममधील पडद्यामागील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात. ते ट्रम्प यांचे जवळचे मानले जातात आणि त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचे कट्टर समर्थक आहेत. आता गोर यांच्याकडे नवीन जबाबदारी देण्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी आनंद व्यक्त केला आहे.

7 महिन्यांनंतर निवड

सर्जियो गोर यांनी एरिक गार्सेट्टी यांची जागा घेतली आहे. ते मे 2023 ते जानेवारी 2025 पर्यंत भारतात अमेरिकेचे राजदूत होते. सुमारे 7 महिन्यांच्या विलंबानंतर ट्रम्प यांनी सर्जियो गोर यांची भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. ट्रम्प यांनी डिसेंबर 2024 मध्येच चीनसह अनेक देशांमध्ये राजदुतांची नियुक्ती केली होती.

Comments are closed.