कामकाज तहकूब करून सत्र सुरू होते.
प्रथम दिनी गोंधळ, महत्त्वाची विधेयके सादर होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा प्रारंभ सोमवारी करण्यात आला आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके सादर केली जाणार आहेत. तथापि, पहिल्याच दिवशी कामकाजात विरोधकांच्या गोंधळामुळे बऱ्याचदा व्यत्यय आल्यानंतर ते दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचा संदेश दिला. हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येकाला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे विनाकारण गोंधळ माजविण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
तथापि, विरोधकांनी हा संदेश मनावर घेतल्याचे दिसून आले नाही. लोकसभा आणि राज्यसभेत कामकाजाचा प्रारंभ झाल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या वतीने मागचे अधिवेशन ते हे अधिवेशन यातील काळामध्ये निधन पावलेल्या सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्वरित गोंधळाला प्रारंभ झाला. विरोधकांनी ‘नीट-युजी’ परीक्षेसंदर्भात तातडीच्या चर्चेची मागणी केली. तथापि, ती फेटाळण्यात आली. त्यानंतर काही काळ घोषणायुद्ध झाले. प्रथम सभागृहाचे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. पण नंतरही गोंधळ न थांबल्याने पुन्हा 2 वाजेपर्यंत कामकाज बंद ठेवण्यात आले. नंतर ते दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. मात्र, मधल्या काळात ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगानासंबंधीचे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. ‘वंदे मातरम्’ला ‘जन गण मन’ समान श्रेणी देण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसेच हे गीत गाण्यात अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई होण्याची तरतूदही या विधेयकात केलेली आहे.
राज्यसभेचे कामकाजही स्थगित
राज्यसभेतही गोंधळाचेच वातावरण होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासंबंधीचा मुद्दा विरोधी सदस्यांनी उपस्थित केला. तसेच मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या. कामकाज चालविणे अशक्य झाल्याने 12 वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले. नंतर ते दुपारी दोन पर्यंत आणि अखेरीस दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. सरकार लाठीमार करून विद्यार्थ्यांचा आवाज दडपत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. तथापि, केंद्र सरकारच्या वतीने या आरोपाचे खंडन करण्यात आले. एकंदर, दिवसभर गोंधळातच गेला.
कोणती विधेयके येणार
लोकसभेच्या सदस्यांची संख्या 850 वर नेण्यासाठी मतदारसंघ परिसीमन विधेयक केंद्र सरकारच्या वतीने या अधिवेशनात सादर केले जाऊ शकते. कार्यक्रमपत्रिकेत या विधेयकाचा समावेश नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. तथापि, ते मांडले जाईल, अशी शक्यता आहे. हे विधेयक या अधिवेशनाचे सर्वात मोठे आकर्षण आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढविण्यासंबंधीचे विधेयक सादर करण्यात येईल. ते संमत झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या 33 वरुन 37 वर नेण्यात येईल. विदेशी योगदान (नियंत्रण) सुधारणा विधेयक सादर होईल. बिगर सरकारी संस्थांना विदेशातून मिळणाऱ्या धनयोगदानाच्या विनियोगावर लक्ष ठेवण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद या विधेयकात आहे. ‘वंदे मातरम्’ संबंधीचे विधेयक सोमवारी सादर करण्यात आले आहे, अशी माहिती कामकाज समितीने दिली.
विरोधकांचीही परीक्षा
संसदेचे प्रत्येक अधिवेशन केंद्र सरकारसाठी परीक्षेचेच असते. यावेळी विरोधी पक्षांचीही परीक्षा आहे. विशेषत: परिसीमन विधेयक मांडले गेल्यास विरोधकांच्या एकात्मतेचा कस लागणार आहे. केंद्र सरकार हे विधेयक या अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये संमत करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करीत आहे.
पहिला दिवस गाजला घोषणायुद्धाने
ड लोकसभा कामकाज सकाळी तीनदा खंडीत, नंतर दिवसभरासाठी स्थगित
ड राज्यसभेतही प्रचंड गदारोळ, लोकशाहीच्या गळचेपीचा विरोधकांचा आरोप
ड या अधिवेशनात परिसीमन विधेयकासह 9 महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर होणार
Comments are closed.