1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना कोर्टाचा दणका; सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळले

1993 मध्ये मुंबईसह संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोघा फरार आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने मोठा दणका दिला. दिर्घकाळ फरार राहिलेल्या मुनाफ अब्दुल मजीद हलारी आणि मोहम्मद शोएब कुरेशी या दोघा आरोपींचे जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावले. दोघेही तब्बल 27 वर्षांपासून फरार होते. ते दिर्घकाळ फरार राहिले तसेच बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्याचे गांभीर्य आणि आरोपींचा कथित सहभाग लक्षात घेत न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला.
12 मार्च 1993 रोजी देशाची आर्थिक राजधानीचे शहर असलेली मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनी हादरून गेली होती. ते बॉम्बस्फोट घडवण्यासाठी मदत केल्याचा आरोप मुनाफ अब्दुल मजीद हलारीवर आहे, तर मोहम्मद शोएब कुरेशी हा बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या मुख्य आरोपींपैकी एक आहे. कुरेशीने बॉम्बस्फोट घडवण्यासाठी दुबईत रचलेल्या कारस्थानामध्ये सहभाग घेतला होता. त्या कटाचे नेतृत्व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने केले होते. नंतर तो बाबरी मशीद पाडल्याचा बदला घेण्याच्या हेतूने शस्त्र प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला गेला होता.
दोन्ही आरोपींच्या जामीन अर्जांना विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांनी जोरदार विरोध केला. हलारीचा बॉम्बस्फोटाच्या कटात खोलवर सहभाग असून त्याने झवेरी बाजारसह विविध ठिकाणी आरडीएक्स स्फोटके ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन नवीन स्कूटर खरेदी केल्या. त्यांची व्यवस्था केली होती, असे अॅड. साळवी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. यावेळी हलारीला नाहक गुंतवण्यात आल्याचा युक्तीवाद त्याच्या वकिलांनी केला. तथापि, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत विशेष न्यायाधीश व्ही. डी. केदार यांनी दोन्ही फरार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळत त्यांना दणका दिला.

Comments are closed.