राजपाल यादवला हायकोर्टाचा मोठा झटका; चेक बाउंस प्रकरणात पुन्हा तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलीवूड अभिनेता राजपाल यादवच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी राजपाल यादववरील ९ कोटी रुपयांच्या चेक बाउंसचे हे प्रकरण खूप चर्चेत आले होते. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याला या समस्येतून बाहेर काढण्यासाठी मोठी आर्थिक मदत देखील केली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. मात्र, आता हायकोर्टाने राजपालचे वागणे संशयास्पद असल्याचे सांगत त्याला पुन्हा जेलमध्ये पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

हायकोर्टाने म्हटले की, राजपाल यादवने हा वाद मिटवण्यासाठी वारंवार दिलेली आश्वासने आणि वचने पाळली नाहीत. म्हणून या प्रकरणात त्याला दोषी धरण्याचा निर्णय कायम ठेवत, राजपालला सात चेक बाउंस प्रकरणांमध्ये तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांनी राजपालला दोषी ठरवून, सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेत बदल केला आहे. यामध्ये न्यायालयाने राजपाल यादवला प्रत्येक प्रकरणात तक्रारदाराला 1.05 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, तक्रारदाराला अतिरिक्त 1.04 लाख रुपये आणि 75 हजार रुपये, तसेच राज्य सरकारला 25 हजार रुपये देण्याचे निर्देशही दिले आहेत.

Comments are closed.