थायलंड, मलेशिया, चीनला जाणाऱ्यांसाठी धक्का; इंडिगोची सहा आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे तात्पुरती बंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंडिगो या विमान कंपनीकडून येत्या 1 जुलैपासून सहा आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या परिचालन खर्चाचा आणि घटत्या प्रवासी मागणीचा फटका आता विमान कंपन्यांनाही बसू लागला आहे. या निर्णयामुळे आग्नेय आशिया आणि चीनमधील लोकप्रिय पर्यटन व व्यावसायिक शहरांशी असलेली थेट हवाई सेवा काही काळासाठी बंद होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मलेशियातील लँगकावी, थायलंडमधील क्राबी आणि व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी या मार्गांवरील उड्डाणे 1 जुलैपासून बंद केली जाणार आहेत. तर हाँगकाँग, शांघाय आणि कंबोडियातील सिएम रीप या शहरांसाठीची विमानसेवा 3 जुलैपासून स्थगित केली जाईल.

सध्या कंपनी दर आठवड्याला 1, 800 हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवत असून बहुतांश सेवा पूर्ववत सुरू राहणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इंडिगोने ब्रिटनमधील मँचेस्टरसाठीची विमानसेवाही ३१ ऑगस्टपासून स्थगित करण्याची घोषणा केली होती.

इंडिगोने स्पष्ट केले आहे की, या सर्व मार्गांवरील सेवा सध्या 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. बाजारातील परिस्थिती आणि प्रवासी मागणीत सुधारणा झाल्यास उड्डाणे त्यापूर्वीही पुन्हा सुरू केली जाऊ शकतात. अन्यथा 1 ऑक्टोबरपासून या मार्गांवरील बुकिंग पुन्हा सुरू करण्याची योजना आहे. विमान कंपनीच्या म्हणण्यानुसार, जुलै ते सप्टेंबर हा कालावधी आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तुलनेने मंद असतो. याशिवाय इंधनाचे वाढते दर, संचालन खर्चातील वाढ आणि काही भागांतील हवाई क्षेत्रावरील निर्बंध यामुळे या मार्गांचे संचालन आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक बनले आहे. असे वृत्त आज तक ने दिले आहे.

इंडिगोच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर मोठा परिणाम होणार नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव, हवाई मार्गांवरील निर्बंध आणि वाढलेला खर्च यामुळे हा मार्ग तोट्यात जात असल्याचे कंपनीने म्हटले होते. या निर्णयाचा फटका बसणाऱ्या प्रवाशांना आगाऊ माहिती दिली जाणार असून त्यांना परतावा किंवा पर्यायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

Comments are closed.