मुख्यमंत्रीसाहेब, हा महाराष्ट्राचा अपमान नाही बरं! अंबाजोगाईच्या ग्रामीण रुग्णालयात एकाच दिवशी 7 डॉक्टरांच्या बदल्या, गोरगरिबांचे रुग्णालय मनुष्यबळाविना सलाईनवर
>> रमाकांत पाटील
फडणवीस सरकारने राज्यात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा केली खरी, पण त्यात शिकवण्यासाठी प्राध्यापक मंडळीच नाहीत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी तसेच अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय रिकामे करण्याचा चंगच सरकारने बांधला आहे. दोन दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयातील तब्बल ३३ डॉक्टर पळवण्यात आले. आता स्वाराती रुग्णालयातून एकाच दिवशी सात डॉक्टरांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे आशिया खंडातील हे पहिले ग्रामीण रुग्णालयच मनुष्यबळाविना सलाईनवर आले आहे. त्याबरोबरच याठिकाणी असलेल्या महत्त्वाच्या तीन पदव्युत्तर विभागांनाही टाळे लागणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय आणि अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे एकेकाळी मराठवाडाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती मिळवून होते. स्वाराती रुग्णालय हे आशिया खंडातील पहिले ग्रामीण रुग्णालय. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून प्रतिष्ठा मिळवलेले हे रुग्णालय सध्या मनुष्यबळाविना ओस पडण्याची भीती आहे. रुग्णालयात सिमेंटची जंगले वाढत आहेत. रुग्णालयाच्या इमारतीवर मजले चढत आहेत. अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध होत आहे. परंतु ती चालवणाऱ्या हातांची मात्र भयंकर कमतरता आहे. स्वाराती रुग्णालयाच्या सर्वच विभागात मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या असताना काल अचानक सात डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्या.
बदल्यांचा सपाटा, नवीन नियुक्त्या बंद
स्वाराती रुग्णालयात आठवड्याला किमान दहा ते पंधरा हजार रुग्ण तपासणीसाठी येतात. सरकारी गुत्तेदार पोसण्यासाठी रुग्णालयाचा अवाढव्य विस्तार करण्यात येत आहे. बहुमजली इमारती उभ्या राहत आहेत. पण त्या इमारतींमध्ये कर्मचारी मात्र नाहीत. गेल्या वर्षभरात अनेक विभागातील शेकड्यांनी कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. परंतु बदलीमुळे रिकाम्या झालेल्या जागा मात्र भरण्यात आल्या नाहीत.
तडकाफडकी बदल्या
काल रात्री कोणतेही कारण नसताना डॉ. राकेश जाधव, डॉ. नागेश अब्दागिरे, डॉ. अमोल कापसे, डॉ. भाऊसाहेब मुंडे, डॉ. राहुल हाके पाटील, डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्यासह अन्य एका डॉक्टरची तडकाफडकी बदली करण्यात आली. यापैकी काही डॉक्टर गेल्यामुळे आता त्यांचे विभागच बंद करण्याची वेळ येणार आहे.
शिवसेना रस्त्यावर उतरणार !
एकाच दिवशी सात डॉक्टरांच्या बदल्या झाल्यानंतर अंबाजोगाईत मोठी खळबळ उडाली आहे. शिवसैनिकांनी अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांना निवेदन देऊन बदल्यांचा जाब विचारला. या डॉ क्टरांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली आहे. डॉक्टरांना कार्यमुक्त केल्यास शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शहरप्रमुख अशोक हेडे, मदन परदेशी, बाळासाहेब वाघळकर, सुखदेव धोतरे, शंकर भिसे, सुधाकर शिंदे, रमेश टेकाळे आदींनी दिला आहे.
वैद्यकीय रुग्णालयातील प्रतिनियुक्त्या रोखा
छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक अशा ३३ जणांची अचानक प्रतिनियुक्ती करण्यात आली. या प्रतिनियुक्त्यांवरून वादळ उठताच त्या थांबवण्याची नामुष्की प्रशासनावर आली. घाटी रुग्णालयातून डॉक्टर मिळणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर आता अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाकडे वाकडी नजर करण्यात आली आहे. मराठवाड्यातील पहिल्या कर्करोग रुग्णालयातूनही निष्णात डॉक्टर वर्ग करण्यात आल्यामुळे तेथील रोबोटिक विभागाच्या कामकाजात अडथळा आला आहे.
औषधशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्राचे पदव्युत्तर विभाग बंद होणार
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सध्या १७१ जागा रिक्त आहेत. मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार रुग्णालयात सध्या प्राध्यापकांच्या ३५ टक्के जागा रिक्त आहेत. त्यात काल सात प्राध्यापकांची अचानक बदली करण्यात आली. त्यामुळे प्राध्यापकांच्या रिक्त जागांची टक्केवारी आता ४५ टक्क्यांवर गेली आहे. या बदल्यांमुळे औषधशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र तसेच मनोरुग्ण विभागाला टाळे लागणार असून हे पदव्युत्तर विभागही बंद होण्याची भीती अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी व्यक्त केली.
Comments are closed.