काळू, डोळखांब नदीत सातजण बुडाले, तिघांना वाचवण्यात यश, तिघांचा मृत्यू तर एक बेपत्ता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळत असताना ट्रेकिंग व पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांची हौस जिवावर बेतली आहे. मुरबाडच्या काळू नदीत दोन ट्रेकर्स वाहून गेले तर डोळखांब येथील चोंढे नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरलेले पाचजण वाहून गेले. त्यात एकाचा बुडून मृत्यू झाला तर एक बेपत्ता आहे. तिघांना वाचवण्यात यश आले आहे. हे सर्वजण कल्याणचे रहिवासी आहेत. दरम्यान धबधबा व नदीच्या काठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

आज रविवार सुट्टी असल्याने पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माळशेज घाटातील काळू धबधब्यावर रमण अण्णापुरे व पवन साठे हे दोघेजण मौजमजा करण्यासाठी गेले होते. पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्याकरिता धबधब्याजवळ त्यांनी ट्रेकिंग सुरू केले. पण पाण्याच्या लोंढ्यामुळे ते काळू नदीत वाहून गेले. खोल प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघांचाही जीव गेला. उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान काळू धबधबा परिसरात प्रशासनाने प्रवेशबंदी लागू केली आहे.

शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात आज दुपारी पावसाने अक्षरशः हाहाकार उडवला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. अशाही परिस्थितीत कल्याणमधील आकाश देशमुख, दिनेश मांडलकर, नितेश पाटील, अजय मुरकुटे, प्रसाद इंगळे हे पाच मित्र चोंढे धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आले होते. मात्र आजचा रविवार त्यांच्यासाठी घातवार ठरला आहे. डोळखांब भागातील नद्या, नाल्यांना पूर आला असून पाण्याच्या लोंढ्यामुळे चोंढे धबधब्याची परिस्थितीही हाताबाहेर गेली होती.

बचाव पथक दाखल झाल्याने तरुण वाचले

भरपावसात अनेक पर्यटक चोंढे धबधब्याजवळ जमले होते. दुपारच्या सुमारास अचानक पाण्याच्या प्रवाह वाढू लागला आणि त्यात आकाश देशमुख (२१) हा अडकला. जिवाच्या आकांताने तो ओरडू लागला. पण खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. दिनेश मांडलकर हादेखील पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेला आहे. त्याचा उशिरापर्यंत ठावठिकाणा लागू शकला नाही. त्यांच्यासोबतचे नितेश पाटील, अजय मुरकुटे व प्रसाद इंगळे हेदेखील लोंढ्यात वाहून जात होते. मात्र अन्य पर्यटकांनी आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनी धाव घेतली. बचाव पथकही दाखल झाले आणि तातडीने मदतकार्य सुरू झाले. त्यामुळे नितेश, अजय, प्रसाद या तिघांनाही वाचवता आले.

लेनाडी नदीत एक बुडाला

तुफान पावसामुळे डोळखांब परिसरातील लेनाडी नदीत पोहण्यासाठी गेलेला ओमप्रकाश वर्मा हा ४० वर्षीय इसम बुडाला. तो ठाण्यात राहणारा होता. आज सकाळी ओमप्रकाश हा आपल्या मित्रांसोबत लेनाड येथे फिरायला गेला होता. तो पोहायला नदीत उतरला खरा, पण पुराच्या लोंढ्यात वाहून गेला. अजून त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

Comments are closed.