सात घुसखोर मारले

तीन पाकिस्तानी सैनिकांचाही समावेश, हल्ल्याचा प्रयत्न उधळला, सीमेवर सैनिकांची कारवाई

वृत्तसंस्था / श्रीनगर, नवी दिल्ली

भारतीय सेनेने काश्मीर सीमेवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रत्यत्न उधळला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत सात पाकिस्तानी घुसखोर दहशतवादी ठार झाले असून त्यांच्यात तीन पाकिस्तानी सैनिकांचाही समावेश आहे. पूंछ विभागाच्या कृष्णा घाटी क्षेत्रातील ही घटना आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पाकिस्तानी सैनिक आणि काही दहशतवादी यांनी भारतीय सेनेच्या कृष्णा घाटी येथील सीमाचौकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न 4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारीच्या मध्यरात्री केला होता. पाकिस्तान साजऱ्या करीत असलेल्या ‘काश्मीर एकात्मता दिवस’ प्रसंगीच या हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, सीमेवर सावध असणाऱ्या सैनिकांनी तो हाणून पाडला. आपला भारतविरोधी कार्यक्रम पुढे रेटण्यासाठी आणि भारतविरोधी अपप्रचार करण्यासाठी पाकिस्तान हा दिवस साजरा करत असतो. या दिवसाचे निमित्त साधून हा या हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.

‘बॅट’चा सहभाग

या हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम’ किंवा बॅट या विभागाकडून करण्यात आला. या विभागात सीमापार दहशतवादी कृत्ये करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. भारताच्या आघाडीवरच्या सीमा चौकीला लक्ष्य करण्याची ही योजना होती. ही चौकी ताब्यात घेऊन भारतात दहशतवादी घुसविले जाणार होते. जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार माजवून तेथील शांतता धोक्यात आणणे आणि लोकांमध्ये भयगंड निर्माण करणे हा हेतू या हल्ल्याच्या प्रयत्नांमागे होते. गेल्या दोन महिन्यांमध्ये असे आणखी हल्ले करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता.

अल् बद्र गटाचे कारस्थान

पाकिस्तानातील अल् बद्र या इस्लामी दहशतवादी संघटनेने या हल्ल्याचे कारस्थान शिजविले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. मारल्या गेलेल्या सात दहशतवाद्यांपैकी चारजण या संघटनेचे हस्तक होते. तर उर्वरित तिघे, पाकिस्तानी सैन्यातील अधिकृत सैनिक होते. ते दहशतवाद्यांना सीमा पार करुन भारतात प्रवेश करण्यासाठी साहाय्य करीत होते. तसेच चौकीवरील हल्ल्याच्या प्रयत्नात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. या सर्वांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

पाकिस्तानची वक्रब्द्धी उघड

भारताशी संबंध सुधारण्याची पाकिस्तानची इच्छा आहे, असे साळसूद विधान काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ यांनी केले होते. त्यानंतर त्वरित पाकिस्तानी सैनिकांचा समावेश असलेल्या टोळीने भारताच्या चौकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावरुन पाकिस्तानचा दुतोंडीपणा सिद्ध होत आहे. पाकिस्तानच्या बोलण्याकडे भारताने लक्ष न देता सीमेवर डोळ्यात तेल घालून देखरेख ठेवली पाहिजे, अशी सूचना या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तज्ञांनी केली आहे. पाकिस्तान वारंवार असे प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

सहा महिन्यांमध्ये वाढ

गेल्या सहा महिन्यांमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर काढल्या जाणाऱ्या कुरापतींमध्ये वाढ झाली आहे. या कालावधीत पाकिस्तान पुरस्कृत हिंसाचारात 44 नागरिकांचा बळी गेला आहे. त्यांच्यात 18 सुरक्षा सैनिकांचाही समावेश आहे. 50 हून अधिक दहशतवाद्यांना या कालावधीत ठार करण्यात आले आहे. पाकिस्ताने काहीही केले आणि वाचाळपणा केला, तरी संपूर्ण काश्मीर भारताचेच होते, आहे आणि भविष्यकाळातही राहील, अशी भारताची भूमिका आहे. तसेच पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाचे समर्थन करण्याचे आणि दहशतवाद्यांना पोसण्याचे काम करीत राहील, तोपर्यंत त्या देशाशी कोणतेही संबंध ठेवले जाणार नाहीत. तसेच शांतता संवादही केला जाणार नाही, असे भारताकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments are closed.