लेडीज सॅण्डलच्या टाचेत सवासात लाखांची एमडी पाकिटे, तस्करीचा नवा फंडा

थर्टी फर्स्टच्या धर्तीवर अमली पदार्थांच्या तस्करीसाठी तस्कर नवनवीन फंडे अजमावत आहेत. अशाच एका ड्रग्ज तस्करीचा डाव उधळून लावत विठ्ठलवाडी पोलिसांनी इस्माईल अब्बासी (५५) याला बेड्या ठोकल्या आहे. त्याच्याकडून पोलिसांनी सवासात लाखांची एमडी पावडर जप्त केली. पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी हे ड्रग्ज लेडीज सॅण्ड्लच्या टाचेत लपवून ठेवले होते.

थर्टीफर्स्टच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी, वाहनांची झडती घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, विठ्ठलवाडी पोलीस शुक्रवारी रात्री उशिरा गस्त घालत असताना त्यांना व्हीटीसी ग्राऊंडजवळ एक व्यक्ती संशयास्पद फिरताना दिसला. पोलिसांना बघून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याच्यावर झडप घातली. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये पोलिसांना लेडीज सॅण्डल सापडले. पोलिसांनी सॅण्डलची हिल तपासली असता त्यात ७ लाख २६ हजारांचे एमडी पावडर मिळाले. इस्माईल अब्बासी हा मूळचा इंदोर येथील रहिवासी असून त्याने हे एमडी कुठून आणले व तो कोणाला विक्री करण्यासाठी आला होता याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments are closed.