दुष्काळाच्या झळा तीव्र : देववाडीतील शेकडो ग्रामस्थांचे स्थलांतर, घरांना कुलूप; वस्ती पडली ओस
अलनिनोमुळे यंदाच्या वर्षी पावसाने दिलेल्या खंडामुळे शेतकर्यांचा संपूर्ण खरीप हंगाम हातचा गेला आहे. हिंगोलीसह मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा गडद होत असतानाच जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या माळावरील देववाडी वस्तीतील जवळपास 80 टक्के ग्रामस्थांचे कामाच्या शोधात तेलंगणा, निजामाबाद, पुणे, सातारा आदी भागात स्थलांतर झाले आहे. देववाडी परिसरात 20 टक्केच काही महिलांसह वयोवृद्ध थांबले आहेत.
यंदाच्या वर्षी अलनिनोचा धोका असताना भाजप व मिध्यांच्या सरकारने कोणतीही उपाययोजना केली नाही. पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकर्यांचा खरीप हंगाम हातचा गेला आहे. 1972 नंतर सर्वात मोठ्या दुष्काळाची झळ आता गडद होत असताना दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या देववाडी वस्तीत जवळपास साडेतीनशेहून अधिक कुटुंबाचे वास्तव्य आहे. येथील ग्रामस्थांचे जनजीवन शेतीवरच अवलंबून आहे. प्रामुख्याने सोयाबीनसह कापूस ही दोन पिके घेतली जातात. या ठिकाणची शेतीही कोरडवाहू असल्यामुळे जोडधंदा म्हणून कोंबड्या, शेळी, गाय पाळण्यात येतात. यंदाच्या वर्षी अलनिनोमुळे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पूर्णत: जागेवरच वाळून गेले. आता अनेक शेतकर्यांसमोर शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत सापडले आहेत. त्यामुळे देववाडीतील जवळपास 80 टक्के ग्रामस्थांनी आपल्या लेकराबाळांसह कामासाठी तेलंगणा, निजामाबाद, सातारा, पुणे या जिल्ह्यांकडे स्थलांतर झाले आहेत. शेकडो ग्रामस्थ कामाच्या शोधासाठी बाहेरगावी गेल्यामुळे अनेक घरांना कुलूप लागल्यामुळे वस्ती ओस पडली आहे. आजघडीला 20 टक्केच महिलांसह अबालवृद्ध गावात दिसून येत आहेत. सरकारने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना तत्काळ हेक्टरी 25 ते 30 हजारांची मदत देणे अपेक्षित असताना दिवाळीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 हजार रुपयांची अग्रीमची रक्कम जाहीर करून शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
कुटुंबासह आद्रक काढणीसाठी सातार्यात आलो
यंदाच्या वर्षी पावसाने दिलेल्या खंडामुळे शेतातील सोयाबीन जागेवरच वाळून गेले. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे अवघड बनल्यामुळे शेतात असलेली बैलजोडीही विक्री करावी लागली. आता सातारा येथे महिनाभरासाठी पत्नी, दोन मुलाबाळांसह आद्रक काढणीला आलो आहोत.
– कृष्णा रिठ्ठे,देववाडी ता.औंढा नागनाथ
मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो
पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी मागील काही दिवस जिल्हाभरात सोयाबीन काढणीच्या कामाला गेलो होतो. आता मिळेल ती मोलमजूरी करत आहे.
– दत्तराव दळवे, देववाडी, ता.औंढा नागनाथ.
देववाडीत २० टक्केच नागरिक
पिंपळदरी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर माळावरील देववाडी वस्ती जवळपास साडेतीनशेहून अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत. यंदाच्या वर्षी पावसाच्या खंडामुळे वस्तीतील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी जवळपास 80 टक्के ग्रामस्थांनी कामासाठी बाहेरील राज्यासह इतर जिल्ह्यात स्थलांतर केले आहे. गावात 20 टक्केच महिलांसह ज्येष्ठ नागरिक वास्तव्यात आहेत.
-बापूराव घोंगडे, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळदरी ता. औंढा नागनाथ
Comments are closed.