शिवडीची मराठी शाळा बिल्डरने चोरली, एसआरए, महापालिका अधिकाऱ्यांचाही कटात सहभाग

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असतानाच मराठी माध्यमाच्या शाळांचा मात्र पद्धतशीरपणे गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवडीमध्ये बिल्डरने चक्क एक मराठी शाळाच चोरल्याचा प्रकार घडला आहे. शाळेच्या जागेवर टॉवर उभारून घरे विकली, पण शाळाच गायब केली. एसआरए आणि मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱयांचाही या कटात सहभाग आहे.

शिवडीच्या किडवाई रोडवरील परेल-भोईवाडा परिसरात सेपंड ऑक्टोबर वसाहतीमध्ये 2009 मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) सुरू झाली. त्या वसाहतीमध्ये असणाऱया सेपंड ऑक्टोबर महापालिका मराठी शाळेचा सुरुवातीला या योजनेत समावेश नव्हता. 2013 मध्ये तो कागदोपत्री करण्यात आला. त्यावेळी या शाळेत नऊ वर्ग खोल्या होत्या आणि 3786.55 चौरस फूट आकाराचे एक छोटे मैदान होते.

वसाहतीच्या जागेवर बीकेसीतील एल्पर्टन डेव्हलपर्स या बिल्डरने टॉवर्स उभारले. तत्पूर्वी सेकंड ऑक्टोबर शाळेचे वर्ग वसाहतीमधील रहिवाशांसाठी बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या ट्रान्झिटमध्ये हलवण्यात आले. तिथे 90 फुटांच्या खोलीत शाळा चालवली जात होती. 2 ऑक्टोबर 2009 मध्ये या शाळेत 250 विद्यार्थी होते, परंतु पुरेशा सुविधा नसल्याने पालकांना विद्यार्थ्यांना नाइलाजास्तव दुसऱया शाळांमध्ये हलवावे लागले. त्यामुळे हळूहळू विद्यार्थीसंख्या शून्यापर्यंत पोहोचून शाळा बंद झाली. 2015 मध्ये सेपंड ऑक्टोबर वसाहतीमधील रहिवासी नव्या टॉवरमध्ये रहायला गेले. गोंधळ झाल्याने शिक्षण समिती अध्यक्षांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश देत बैठक तहकूब केली होती. नगरसेवकांच्या प्रश्नाला प्रशासनाने दोन वर्षांनंतर उत्तर देत या प्रकरणात कोणतेही तथ्य नाही असा दावा केला होता.

शिक्षक परिषदेकडून पोलिसात तक्रार दाखल

शाळा बांधल्याशिवाय टॉवर्स विकण्याची परवानगी देता येत नाही. मात्र एसआरएतील अधिकाऱयांनी 8 डिसेंबर 2017 रोजी बिल्डरला एनओसी दिली. हे अत्यंत गंभीर, लज्जास्पद आणि भ्रष्ट कृत्य आहे आणि ते खूप गांभीर्याने घेतले पाहिजे. एनओसीची प्रत त्यांनी महानगरपालिकेच्या वॉर्ड अधिकारी व अन्य संबंधित अधिकाऱयांना दिल्यानंतर त्यांनीही सराईतपणे डोळेझाक केली, त्यांच्या मदतीनेच बिल्डरने शाळा चोरली, असा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सचिव शिवनाथ दराडे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे.

बैठकीला बोलवूनही बिल्डर गैरहजर

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या शाळेचा मुद्दा लावून धरला. महानगरपालिका शिक्षण विभागाने 10 ऑगस्ट 2025 रोजी एल्पर्टन डेव्हलपर्स बिल्डरला दोन पत्रे दिली. बैठकीला बोलवूनही बिल्डर किंवा त्याचे प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने पोलिसात तक्रार दाखल करत आहोत असा इशाराही महापालिकेने दिला, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र केली नाही.

Comments are closed.