केरळ धावपटूचे लैंगिक शोषण उघड

वृत्तसंस्था / थिरुवनंतपुरम

एका 18 वर्षांच्या महिला धावपटूचे किमान 60 पुरुषांकडून गेली पाच वर्षे सातत्याने लैंगिक शोषण होत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या महिला धावपटूवर तिच्या वयाच्या 13 व्या वर्षांपासून लैंगिक अत्याचार केले जात होते. या अन्यायाविरोधात तिने तक्रार सादर केल्याने आता पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे. किमान 62 पुरुषांनी या खेळाडूवर लैंगिक अत्याचार केले आहेत, असे केरळ पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी दल स्थापन करण्यात आले आहे. सर्व 62 आरोपींचा शोध लवकरच घेण्यात येईल, असे केरळच्या प्रशासनाने स्पष्ट केले असून या लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या धावपटूकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे केरळमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेक महिला संघटनांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध करत खेळाडूला न्याय देण्याची मागणी केली आहे.

या धावपटूच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवून गेली पाच वर्षे सातत्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. या खेळाडूचे प्रशिक्षण, पुरुष सहधावपटू आणि क्रीडा विभागातील इतर अधिकारी पुरुषांचा या अत्याचारांमध्ये सहभाग असल्याचे उघड होत आहे. या पिडीत धावपटूने प्रथम बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तिच्यावर ओढविलेले प्रसंग स्पष्ट केले. त्यानंतर तपासाची चक्रे फिरु लागली आहेत. भीतीपोटी मी इतके दिवस तक्रार करु शकले नाही. कारण मला कोणाचाही आधार नव्हता. मात्र, आता हे सर्व अत्याचार मला असह्या झाल्याने मी पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांची नावेही स्पष्ट केली आहेत, असे प्रतिपादन या धावपटूने केले. क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली असून त्वरित याची चौकशी करण्यात यावी, आणि सर्व दोषींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. अशा प्रकारांमुळे क्रीडा क्षेत्राची मानहानी होत असून राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी क्रीडाक्षेत्राशी संबंधित अनेक मान्यवरांनी केली आहे.

Comments are closed.