मृतदेहासोबत शारिरीक संबध ठेवल्यास बलात्कार होतो का? जाणून घ्या हायकोर्ट काय म्हणालं?
मुंबई: छत्तीसगड उच्च न्यायालयाने मृतदेहासोबत लैंगिक संबध ठेवल्यानंतर बलात्कार होतो का याबाबात मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 किंवा लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO कायदा) अंतर्गत मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवणे हे बलात्कार नाही. मुख्य न्यायमूर्ती रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती बिभू दत्ता गुरू यांचा समावेश असलेल्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबतच्या सुनावणीवेळी सांगितले की, मृत शरीरावर बलात्कार (नेक्रोफिलिया) हे सर्वात घृणास्पद कृत्य असले तरी, ते संबंधित तरतुदींनुसार बलात्काराच्या गुन्ह्यासारखे नाही. IPC आणि POCSO कायद्यांतर्गत येणार नाही. पीडिता जिवंत असतानाच अशा तरतुदी लागू होतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
बार अँण्ड बेंचच्या अहवालानुसार, उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘ एका प्रकरणातील आरोपी नीलकंठ उर्फ नीलू नागेश याने केलेला गुन्हा म्हणजे मृतदेहावर बलात्कार करणे हा सर्वात घृणास्पद गुन्हा आहे. यामध्ये शंका नाही. परंतु या प्रकरणाची वस्तुस्थिती अशी आहे की आजपर्यंत, आरोपीला आयपीसीच्या कलम 363, 376 (3), पॉक्सो कायदा, 2012 चे कलम 6 आणि कलम 3(2)(v) अंतर्गत दंडनीय गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. 1989 च्या कायद्याला दोष देता येणार नाही. कारण बलात्काराचा गुन्हा मृतदेहासह करण्यात आला होता आणि वरील कलमांखाली गुन्हा सिद्ध होण्यासाठी पीडिता जिवंत असणे आवश्यक आहे, असं न्यायालयाने म्हटले आहे.
अल्पवयीन पीडितेचे अपहरण, बलात्कार आणि हत्येशी संबंधित दोन आरोपींनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. पिडितेवर मृत्यूनंतरही लैंगिक अत्याचार झाले. नितीन यादव आणि नीलकंठ नागेश या दोन आरोपींना आयपीसी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
हे प्रकरण 2018 मध्ये छत्तीसगडमधील गरिआबंद जिल्ह्यात एका 9 वर्षीय मुलीच्या हत्येनंतर केलेल्या बलात्काराचे आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला छत्तीसगड उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.आपला निकाल देताना, न्यायालयाने म्हटले की, मृतदेहावर बलात्कार करणे हे सर्वात भयानक कृत्यांपैकी एक आहे, परंतु ते बलात्कार कायद्याच्या आणि POCSO अंतर्गत कोणत्याही गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही.
सरन्यायाधीश रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती बिभू दत्त गुरु यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सुनावणीवेळी सांगितले की, बलात्काराचा गुन्हा करण्यासाठी पीडितेचे जिवंत असणे आवश्यक आहे. याचा अर्थ सध्याच्या भारतीय कायद्यात मृत शरीरावर बलात्कार (नेक्रोफिलिया) हा गुन्ह्याच्या श्रेणीत समाविष्ट नाही. या आधारे आरोपीला शिक्षा होऊ शकत नाही. अशा प्रकारे खंडपीठाने ट्रायल कोर्टाचा निर्णय कायम ठेवत आईची याचिका फेटाळली आहे.
खून आणि बलात्काराचे हे प्रकरण 2018 सालचे आहे. छत्तीसगडमधील गरिआबंदमध्ये एका नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्येची घटना घडली. या घटनेप्रकरणी आरोपी नीलकंठ उर्फ नीलू नागेश याला पोलिसांनी अटक केली आहे. मृतदेहावर बलात्कार केल्याचे आरोपीने आपल्या जबाबात म्हटले होते. या खटल्याची सुनावणी करताना ट्रायल कोर्टाने मुख्य आरोपी नितीन यादव याला खून आणि इतर गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या घटनेत सहभागी असलेल्या नीलकंठ नागेश याला पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
केंब्रिज डिक्शनरीनुसार, नेक्रोफिलिया म्हणजे मृतदेहांसोबत लैंगिक आकर्षण. नेक्रोफिलिया ही सामान्यतः एक दुर्मिळ आणि असामान्य घटना आहे. याचे फार कमी पुरावे आहेत. केजीएमयू, लखनौ येथील तज्ज्ञ एससी तिवारी यांच्या मते, हा एक मानसिक आजार आहे, जो दहा लाखांपैकी एका व्यक्तीला असतो.
नेक्रोफिलिया म्हणजे काय?
नेक्रोफिलिया हा एक मानसिक विकार आहे. ज्यामध्ये व्यक्ती मृत शरीराशी शारीरिक संबंध ठेवू लागते. या प्रकारच्या विकाराला पॅराफिलिया म्हणतात. यामध्ये पीडोफिलिया किंवा नेक्रोफिलिया देखील समाविष्ट आहे.
Comments are closed.