Asia Cup: BCCIच्या अधिकाऱ्यांचा भारत- पाक सामन्यावर बहिष्कार! दुबईत सामना पाहायला जाणार नाहीत?

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK)यांच्यातील सामन्यास आता 24 तासांपेक्षाही कमी वेळ शिल्लक आहे. रविवार, 14 सप्टेंबर रोजी टीम इंडिया आपल्या चिरप्रतिद्वंद्वी पाकिस्तानशी भिडणार आहे. मात्र यावेळी भारत-पाक सामन्याभोवती आधीसारखं वातावरण दिसत नाही. इतकंच नव्हे तर या महामुकाबल्याचे सर्व तिकीटही अजून विकले गेलेले नाहीत. चाहते सोशल मीडियावर या सामन्याच्या बहिष्काराची मागणी करत आहेत.

यादरम्यान, चर्चा सुरू आहे की, बीसीसीआयचे अनेक मोठे अधिकारी देखील या सामन्याचा विरोध करत आहेत. ते भारत-पाक सामन्यापासून दूर राहणार आहेत.

रिपोर्टनुसार, बीसीसीआयचे अनेक अधिकारी भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुबईला जाणार नाहीत. एवढंच नाही तर रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की, अजूनपर्यंत बीसीसीआयचा एकही मोठा अधिकारी दुबईत पोहोचलेला नाही. याआधी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दुबईत भारत-पाकिस्तानचा सामना झाला होता, तेव्हा बीसीसीआयचे जवळपास सर्व अधिकारी तिथे उपस्थित होते.

रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय सचिव देवाजीत सैकिया, आयपीएल चेअरमन अरुण धूमल, कोषाध्यक्ष प्रभतेज भाटिया आणि संयुक्त सचिव रोहन देसाई हे भारत-पाकिस्तान सामन्यासाठी दुबईला जाणार नाहीत. मात्र, बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष राजीव शुक्ला मात्र सामन्यादरम्यान तिथे उपस्थित राहू शकतात. ते दुबईला जाण्याची शक्यता आहे.

यावर्षीच जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याचा विरोध होत आहे. या हल्ल्यात 26 निरपराध भारतीयांना आपला जीव गमवावा लागला होता. याच कारणामुळे भारतीय क्रिकेट चाहते या सामन्याचा विरोध करत आहेत आणि भारत-पाक सामन्याच्या बहिष्काराची मागणी करत आहेत. देशात दहशतवादी हल्ला होऊन 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही पाकिस्तानशी सामना खेळला जात असल्याने चाहते बीसीसीआयवरही टीका करत आहेत.

Comments are closed.