शहा यांनी गुजरातच्या 'यूसीसी' मंजुरीचे कौतुक केले

देश समानतेनेच चालवला जाणार असल्याचा निर्धार व्यक्त  : विरोधकांवर साधला निशाणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उत्तराखंडनंतर, भाजपशासित आणखी एक राज्य, गुजरातनेही समान नागरी संहिता (युसीसी) विधेयक मंजूर केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर आनंद व्यक्त करत सर्व नागरिकांसाठी समान कायद्यांवर देश चालवणे हे आमचे प्राधान्य आणि आमचा संकल्प असल्याचे सुतोवाच केले. तसेच देश समानतेनेच चालवला जाईल असे सांगतानाच तुष्टीकरण अयोग्य असल्याचा  निशाण त्यांनी विरोधकांवर साधला.

गुजरात विधानसभेने मंगळवारी सात तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर युसीसी विधेयक मंजूर केले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी हे विधेयक सभागृहात सादर केले होते. आता, राज्यपालांच्या संमतीनंतर युसीसी संपूर्ण राज्यात लागू होईल आणि तो कायदा बनेल. गुजरात विधानसभेच्या या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आपले मत मांडले. देशातील प्रत्येक नागरिकासाठी समान कायदा असणे हा भाजपचा स्थापनेपासूनचा संकल्प आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची राज्य सरकारे या दिशेने सातत्याने पुढे जात आहेत. उत्तराखंडनंतर गुजरातनेही ऐतिहासिक युसीसी विधेयक मंजूर करून आपली वचनबद्धता दाखवली आहे. यासाठी मी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांचे अभिनंदन करतो, असे शाह म्हणाले. ‘देश यापुढे तुष्टीकरणाच्या आधारावर नव्हे, तर सर्व नागरिकांसाठी समान कायद्यांच्या आधारावर चालवला पाहिजे,’ हे त्यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Comments are closed.