सुरक्षेचं कारण मान्य, पण बांगलादेशचं काय? शाहीद आफ्रिदीचे आयसीसीवर गंभीर आरोप; विश्वचषकातील माघारीवरून व्यक्त केला संताप

आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मधून बांगलादेशच्या संघाने माघार घेतली आहे (ICC T20 international world cup 2026). भारतात सुरक्षेच्या कारणास्तव सामने खेळण्यास बांगलादेशने नकार देत भारताबाहेर टी-20 वर्ल्डकप सामने खेळवावे, अशी मागणी त्यांनी आयसीसीकडे केली होती. पण आयसीसीने मात्र याला साफ नकार दिल्याने बांगलादेश संघ वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

बांगलादेशच्या ठिकाणी आता स्कॉटलंड स्पर्धेत खेळणार आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहीद आफ्रिदीने (Shahid Afridi) या प्रकरणावर आयसीसीला सुनावलं आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधी भारतात स्पर्धा खेळण्यास नकार दिला होता आणि आयसीसीला सामन्यांचे ठिकाण बदलण्याची विनंती केली होती. परंतु वेळापत्रक निश्चित असताना अखेरच्या क्षणी बदल होणार नाहीत व बांगलादेश संघाला भारतात कोणताही धोका नसल्याची पडताळणी केल्यानंतर आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली. बांगलादेशला स्पर्धेतून काढून टाकण्याच्या आयसीसीच्या निर्णयाला पाकिस्तानने जोरदार विरोध केला आहे. पीसीबीसह माजी पाकिस्तानी खेळाडू आयसीसीला सुनावत आहेत.

शाहिद आफ्रिदीने बांगलादेशला पाठिंबा देत आयसीसीवर जोरदार टीका केली आहे, तसेच प्रशासकीय मंडळ वेगवेगळ्या संघांना वेगवेगळे नियम लागू करत असल्याचा आरोप केला आहे. आफ्रिदीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं, एक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून आयसीसीच्या विसंगतीमुळे मी खूप निराश झालो आहे. 2025 मध्ये पाकिस्तानचा दौरा न करण्यासाठी भारताच्या सुरक्षेचा मुद्दा आयसीसीने मान्य केला होता, पण बांगलादेशसाठी मात्र हे लागू होत नाही आणि त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने निर्णय घेण्यात आला.

एकसारखा न्याय आणि संतुलन हा जागतिक क्रिकेट प्रशासनाचा आधारस्तंभ असायला हवा. बांगलादेश क्रिकेट संघाचे चाहते आणि खेळाडू यांच्या भावनांची कदर व्हायला हवी होती. त्यांना वेगळा न्याय का? आयसीसीने मनं जोडायचं काम करायला हवं, तोडायचं नाही, असं आफ्रिदीने पोस्टमध्ये पुढे म्हटलं.

आयसीसीने बांगलादेश संघाला टी-20 विश्वचषक 2026 मधील सहभागाबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यासाठी 24 तास दिले होते. त्यानंतर बांगलादेशने स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. यानंतर शनिवारी 24 जानेवारी रोजी आयसीसीने बांगलादेश संघ अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर करत स्कॉटलंडला स्पर्धेत खेळण्यासाठी आमंत्रण दिले. आयसीसीच्या या निर्णयाविरुद्ध पाकिस्तानने भाष्य केलं आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी त्यावर आक्षेप घेतला. याचबरोबर पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्डकपवर बहिष्कार टाकू शकतो, असा अंदाज व्यक्त केला. प्रत्युत्तरादाखल, आयसीसीने पाकिस्तानला इशारा दिला की जर त्यांनी स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार केला तर त्यांच्यावर बंदी घातली जाईल.

Comments are closed.