भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी चौकाला दिले आईचे नाव, शहीदाच्या मुलाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

भाजपचे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी एका चौकाला आपल्याच आईंचे नाव दिले आहे. आता हा प्रकार त्याच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण जोरगेवार यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. गोवा मुक्ती संग्रामात शहीद झालेले चंद्रपूरचे सुपुत्र बाबुराव थोरात यांच्या मुलाने ही तक्रार केली आहे. विजय थोरात असे त्यांचे नाव असून, त्यांनी यापूर्वी अनेकदा महापालिकेकडे आपल्या पित्याचे नाव एखाद्या चौकाला, बागेला किंवा मार्गाला द्यावे, अशी वारंवार मागणी केली, मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण आमदार जोरगेवार यांच्या आईच्या नावे चौक बहाल करण्यात महापालिकेने तत्परता दाखवली. आमदार जोरगेवार यांच्या अट्टाहासपोटी हे सगळे होत असून, सत्तेचा ते गैरवापर करीत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने आंदोलनही केले होते त्याशिवाय समाजमाध्यमातूनही जोरगेवार यांचा समाचार घेतला जात आहे.
देशासाठी बलिदान देणाऱ्या एका शहिदाला सन्मान देण्यात कुचराई करणाऱ्या महापालिकेने आमदाराच्या आईचे नाव चौकाला देण्यात एवढी तत्परता काही दाखवली, असा सवाल विजय थोरात यांनी केला. केवळ त्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या आई आहेत, म्हणून महापालिका झुकली का, असा प्रश्न त्यांनी केला. आमदाराच्या अम्माचे असे कोणते महान कार्य आहे, बलिदानापेक्षा मोठे आहे का, असे सवाल विजय थोरात यांनी केले. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार केली असून शहिदांचा अवमान करू नका, अशी विनंती केली आहे.
Comments are closed.