तहसीलदार घोंगडीवर बसले आणि गावकऱ्यांच्या दारी पाणी आले; परमेश्वर कासुळे यांचा झटपट निर्णयांचा सपाटा
अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन विधायक असेल तर अवघड समस्यादेखील चुटकीसारख्या सुटतात याचा प्रत्यय नुकताच शहापूर तालुक्यात आला. गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचे चटके सोसणाऱ्या दहिगाव येथील कातकरीवाडीतील पाणी प्रश्न तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या झटपट निर्णयामुळे मार्गी लागला. महाराजस्व शिबिराच्या जनजागृतीसाठी तालुक्यात अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. दहिगाव येथे घोंगडीवर बसून तहसीलदार गावकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी ग्रामस्थांनी पाणीटंचाईची व्यथा सांगताच परमेश्वर कासुळे यांनी पाण्याचे टँकर आणि पाच हजार लिटरच्या दोन टाक्या लगेच मंजूर केल्या. ‘साहेब, तुम्ही घोंगडीवर बसलात आणि आमच्या दारी पाणी आले’ असे म्हणत ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.
तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी शहापूर तालुक्यातील खर्डी विभागातील दहिगाव, उबरखांड, जरंडी, दळखण व टेंभा येथील गावपाड्यांत घोंगडी सभा घेतल्या. दरवर्षी आपला ७/१२ तपासणे, विद्यार्थ्यांचे दाखले, फार्मर आयडी, आयुष्यमान कार्ड, रेशन कार्डवरील नावनोंदणी याबाबत तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
तहसीलदारांच्या घोंगडी सभेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याच घोंगडी सभेदरम्यान दहिगाव येथील कातकरीवाडीत तीव्र पाणीटंचाई ग्रामस्थांनी कथन केली. यावर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तत्काळ येथे पाण्याचे टँकर आणि पाच हजार लिटरच्या दोन टाक्या मंजूर करून येथील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावला.
काय आहे घोंगडी सभा?
झाडाखाली, मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी किंवा मोकळ्या जागेत घोंगडी बैठक घेतली सर्व अधिकारी जमिनीवर बसून ग्रामस्थांशी थेट संवाद साधतात. शासकीय योजना आणि प्रलंबित कामासंदर्भात अधिकारी जमिनीवर बसून संवाद साधत असल्याने ग्रामस्थांचा घोंगडी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Comments are closed.