शाहचा दहशतवादावर हल्ला

राज्यसभेत अनेक विरोधी पक्षांवरही शरसंधान

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

कोणत्याही कारणांसाठी आणि कोणत्याही प्रकारचा दहशतवाद आम्ही देशात खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यासभेत केले आहे. केंद्रीय गृहविभागाच्या कामकाजाच्या विषयावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी या विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला. विरोधी पक्षांनी उपस्थित केलल्या आक्षेपांना त्यांनी उत्तरे दिली.

या देशात गेल्या चार दशकांपासून दहशतवाद, नक्षलवाद आणि पूर्व उग्रवाद अशा तीन असूरी प्रवृत्तींनी उच्छाद मांडला होता. पूर्व उग्रवादाला आम्ही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. दहशतवादाच्या विरोधात आम्ही शून्य सहनशक्तीचे धोरण अवलंबिले आहे. तर नक्षवलाद पुढच्या वर्षाच्या 31 मार्च पर्यंत संपविला जाणार आहे, असा निर्धार व्यक्त करणारे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.

दहशतवादात प्रचंड घट

गेल्या जवळपास 11 वर्षांच्या काळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये होणारी जीवीतहानी 70 टक्के घटली आहे. तसेच अनेक नक्षलवादी आमच्या कारवाईत मारले गेले आहेत. आम्ही सर्वमामान्यांच्या साठी काम करण्याचा निर्धार केला आहे. तीच आमची प्राथमिकता आहे. नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आम्हाला अर्धसैनिक दलांचे मोठे सहकार्य लाभत आहे. यासाठी सरकार त्यांचे आभारी आहे. सीमा सुरक्षा आणि देशाची अंतरिक सुरक्षा केंद्रीय गृहविभागाच्या कार्यकक्षेत येते. पूर्वी ती वेगवेगळ्या राज्यांच्या कार्यकक्षेत होती. तथापि अलिकडच्या काळात अपराधांचे स्वरुप भिन्न झाले आहे. अनेक अपराध राज्यांतर्गतही आहेत आणि बहुराज्यीयही आहेत. त्यामुळे त्यांची हाताळणी एका प्राधिकारणाकडून होणे उचित आहे. यासाठी गृहविभागामध्येही परिवर्तन होण्याची आणि त्याचे आधुनिकीकरण होण्याची आवश्यकता आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने केंद्रीय गृहविभागात अनेक सुधारणा आणि परिवर्तने होऊन तो अधिक सक्षम झाला आहे, हे मी गर्वाने स्पष्ट करतो, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

विरोधी पक्षांवर शरसंधान

आपल्या एक तासभराच्या भाषणात अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर मोठी टीका केली. विरोधी पक्षांची भूमिका नकारात्मक आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात केवळ राजकीय कारणास्तव आघाडी उघडली आहे. केंद्राने कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा थोपविलेली नाही. तथापि, या मुद्द्यावर स्टॅलिन तामिळनाडूच्या जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांनी धारेवर धरले. भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये होती तेव्हा तेथे मी दहशतवादी पाहिले, असे विधान राहुल गांधी यांनी परदेशात केले होते. त्याचा समाचार शहा यांनी घेतला. राहुल गांधी यांच्या मनातच दहशतवादी आहेत. त्यामुळे ते त्यांना स्वप्नातही दिसतात आणि काश्मीरमध्येही दिसतात. राहुल गांधी काश्मीरला गेले. तेथे बर्फावर खेळ खेळले आणि नंतर मला तेथे दहशतवादी दिसले अशी हास्यास्पद भाषा त्यांनी केली, असा टोला अमित शहा यांनी लगावला. घटनेचा अनुच्छेद 370 हटवून काय साधले, असा प्रश्न विरोधी पक्ष विचारतात. त्यांना गेल्या पाच वर्षांमध्ये काश्मीरमध्ये  झालेली विकासकामे दिसत नाहीत. राहुल गांधी यांनी डोळ्यांवर काळा चष्मा लावला आहे. ज्यांचे मन आणि डोळे बंद आहेत, त्यांना चांगली कामे कशी दिसणार, असाही खोचक प्रश्न शहा यांनी आपल्या भाषणात विचारला.

न्यायाधीशाचा मुद्दाही उपस्थित

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या प्रचंड बेहिशेबी रकमेचा मुद्दाही राज्यसभेत शुक्रवारी उपस्थित करण्यात आला. या न्यायाधीशावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच कृत्रिम अंमली पदार्थांसंबंधीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. भारतात अशा पदार्थांचा सुळसुळाट वाढला आहे. केंद्र सरकारने या पदार्थांच्या विरोधात कठोर करवाई केली पहिजे, कारण देशातील तरुणाई झपाट्याने या पदार्थांच्या विळख्यात सापडत आहे. त्यामुळे केंद आणि राज्य सरकारांनी सावध राहिले पाहिजे अशी सूचना केली गेली.

Comments are closed.