शाई होपनं मोडला सचिन तेंडुलकरचा विश्व विक्रम; असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला

वेस्ट इंडिजचा एकदिवसीय कर्णधार शाई होपने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमधील दुसरा एकदिवसीय सामना नेपियरमधील मॅकलीन पार्क येथे खेळला गेला. या सामन्यात होपने 69 चेंडूत 109 धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये 13 चौकार आणि चार उत्तुंग षटकार मारले. हे त्याच्या कारकिर्दीतील 19वे एकदिवसीय शतक होते. या शतकासह, त्याने “क्रिकेटचा देव” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रमही मोडला. हो, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक संघांविरुद्ध शतके झळकावण्याचा हा विश्वविक्रम आहे.

सचिन तेंडुलकरने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 11 संघांविरुद्ध एकदिवसीय शतके झळकावली होती, तर शाई होपने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. होप आता 12 देशांविरुद्ध एकदिवसीय शतके झळकावणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.

न्यूझीलंडपूर्वी होपने झिम्बाब्वे, भारत, बांगलादेश, आयर्लंड, अफगाणिस्तान, श्रीलंका, नेदरलँड्स, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ आणि इंग्लंडविरुद्ध शतके झळकावली आहेत.

वेगवेगळ्या संघांविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावणारे खेळाडू:

१२- शाई होप*
11 – सचिन तेंडुलकर
11 – रिकी पाँटिंग
11- ख्रिस गेल
11- हाशिम आमला
11 – मार्टिन गप्टिल
10 – सौरव गांगुली
10 – हर्शेल गिब्स
10 – एबी डिव्हिलियर्स
10 – टी दिलशान
10 – इऑन मॉर्गन
10 – रोहित शर्मा

यासह, शाई होप आता वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावणारा दुसरा फलंदाज बनला आहे. त्याच्या आणि ब्रायन लारा दोघांच्याही नावावर 19 एकदिवसीय शतके आहेत. लाराने ही शतके 258 डावांमध्ये झळकावली आहेत, तर होपने फक्त 142 डावांमध्ये 19 एकदिवसीय शतके झळकावली आहेत. वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक शतकांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, त्याने 291 डावांमध्ये 25 शतके झळकावली आहेत.

Comments are closed.