आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य

सातारा : राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या (Satara Sangli Vidhan Parishad) पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत तिढा अद्यापही कायम असल्याचं चित्र आहे. साताऱ्यात मंगळवारी शिवसेनेच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्व सदस्यांचे मत जाणून घेतल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली.”आमचा निर्णय मतदानाच्या अगोदर होईल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील, तोच आम्हाला मान्य असेल, असं शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी स्पष्ट केलं.

या बैठकीत उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या भावना पक्षाच्या कोअर कमिटीकडे मांडल्या आहेत. शंभूराज देसाई म्हणाले की, “या सर्व लोकांच्या भावनांचा आणि मतांचा सविस्तर अहवाल आम्ही पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (मराठी) यांच्याकडे सादर करणार आहोत. काल महायुतीचा तिढा सुटला असं म्हटलं जात होतं, मात्र आमच्यापर्यंत तसा कोणताही अधिकृत निर्णय आलेला नाही.”

Shambhuraj Desai Press Conference : अंतिम आदेश एकनाथ शिंदेंचा

शंभूराज देसाई म्हणाले की, “भाजपचे नेते मला अद्यापपर्यंत भेटलेले नाहीत आणि कसलीही चर्चा झालेली नाही. भाजप बहुमताजवळ आहे. आम्ही महायुतीचा नियम पाळणार असलो, तरी अंतिम आदेश एकनाथ शिंदेंचा असेल. भाजप गॅसवर नाही.”

भाजपच्या मतदारांना अज्ञातस्थळी पाठवले असल्याच्या चर्चांवर बोलताना देसाई म्हणाले की, आमच्या सदस्यांना कुठेही टूरवर पाठवलेले नाही. आमचे सदस्य पूर्णपणे फ्री आहेत आणि आजच्या बैठकीला सर्व जण हजर होते.

भाजपच्या बैठकीला शिवसेनेचे आमदार महेश शिंदे उपस्थित होते, कारण ते महायुतीचा घटक आहेत. आज त्यांना काही वैयक्तिक काम असल्यामुळे ते शिवसेनेच्या बैठकीला येऊ शकले नाहीत, असं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं.

Shambhuraj Desai On Operation Tiger : ‘ऑपरेशन’ पूर्ण झाल्यावरच कळतं

ठाकरे गटाचे पाच ते सहा खासदार फुटणार असल्याच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर आणि संजय राऊतांच्या टीकेवर शंभूराज देसाई यांनी जोरदार टोला लगावला. संजय राऊत यांच्यासाठी ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’ अशी परिस्थिती झाली आहे. ते मनाला वाटेल ते बोलत असतात. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे सकाळी 10 वाजता त्यांच्याकडे बूम घेऊन जाणारे हळूहळू कमी होतील, असं शंभूराज देसाई म्हणाले.

शिवसेनेतील अजून कोणीही फुटलेले नाही, त्यामुळे त्यांच्याकडे संशयाने पाहण्याची गरज नाही. मात्र, राजकारणात कोणतीही ऑपरेशन्स ही अत्यंत काळजीपूर्वक केली जातात आणि ती पूर्ण झाल्यावरच जगाला कळतात, असे सूचक वक्तव्यही शंभूराज देसाई यांनी केलं.

ही बातमी वाचा:

Comments are closed.