कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचा आरोप
Satara ZP Election 2026 सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत साताऱ्यात नाट्यमय घडामोडी दिसून आल्या. भाजपच्या प्रिया शिंदे या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या तर राजू भोसले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय घडलं यासंदर्भात साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी भूमिका पत्रकार परिषद घेत मांडली. यावेळी शंभूराज देसाई यांनी कामेश कांबळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्याला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी दम दिल्याचं म्हटलं.
शंभूराज देसाई काय म्हणाले?
सातारा जिल्हा परिषद साध्या वेषातील पोलिसांनी भरली होती. आमचे सन्माननीय सदस्य बापूसाहेब शिंदे यांचं आमच्याच सदस्यांनी अपहरण केल्याची खोटी तक्रार काल दाखल केली. बापूसाहेब शिंदे पोलीस स्टेशनला जाऊन पहाटे जबाब दिला. माझं कोणी अपहरण केलं नाही, मी पक्षासोबत असल्याचा जबाब त्यांनी दिला. यानंतर दुसरा गुन्हा सव्वा सहा वाजता दाखल केला, ज्यात आमच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांची नावं घातली आणि दोन इतरांची होती. दोन जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असं शंभूराज देसाई म्हणाले.
कामेश कांबळे जे आमचे सदस्य होते, त्यांना मी आणि मकरंद आबा लिफ्टमधून वर घेऊन जात असताना माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्याला अडवलं. तो म्हणाला मला बोलायचं नाही, मी आबांच्या आणि दादांच्या बरोबर जाणार आहे, एवढं स्पष्ट त्या कामेश कांबळेनं सांगितलं तरी बाबांनी त्याला दम दिला. बाबांबरोबर ज्यांचा जिल्हा परिषद निवडणुकीशी संबंध नाही असे सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि फिरोज पठाण हा कार्यकर्ता होता. मी कामेशला मिठीत धरलं होतं, माझ्या मिठीतून सोडवून कामेशला उजव्या बाजूच्या वरांड्यात नेलं. मी आणि आबांनी त्यांच्या मिठीतून सोडवून त्याला लिफ्टमध्ये आणलं. लिफ्टमधून चौथ्या मजल्यावर घेऊन गेलो. आमच्या सदस्यांबरोबर आत जाऊन कामेश कांबळे आमच्या सदस्यांच्या बाजूला बसले, असं शंभूराज देसाई म्हणाले. मकरंद आबा वर थांबले होते.
अनिल देसाई आणि संदिप मांडवे यांना वरच्या मजल्यावर घेऊन आल्यानंतर 100 साध्या वेषातील पोलीस लिफ्टबाहेर उभे होते. दरवाजासमोर दांडकी आडवी लावली. 25-30 पोलीस मागं ढकलत होते. सदस्यांना 10-10 पोलीस ओढत होते. दरवाज्यापर्यंत अनिल देसाई आणि संदिप मांडवेंना नेलं असता जादा पोलिसांना बोलावलं आणि आमच्या तावडीतून दोन सदस्यांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले. लोकांनी कौल आमच्याबाजूनं दिलेला,37 जागा विजयी झाल्या होत्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीची निवडणूक पूर्व आघाडी होती. आमच्या दोन सदस्यांनी व्हीप मोडला, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी व्हीप मोडला, त्यांच्यावर कारवाई करु, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ असं शंभूराज देसाई म्हणाले.
मला एकच सांगायचं आहे आम्ही 33 सदस्य तिथं निघालो होतो. मतदानासाठी दरवाज्यावर आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना तिथून ओढून नेलं. मंत्र्याला जखम होते, मंत्र्याला ओढता, याचं ही भान नाही. पोलीस भाजपचे मांडलिक झाल्यासारखं वागले आहेत, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं. समारोप करताना मी एवढंच सांगेन या प्रकरणाची सुरुवात भारतीय जनता पक्षानं केलेली आहे, पण याचा शेवट राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनेची युती करेल, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.
आणखी वाचा
Comments are closed.