पुन्हा दुखापती झाली तर जसप्रीत बुमराहच करिअर संपुष्टात येईल, शेन बॉन्डचं मोठं विधान

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. Champions Trophy 2025 मध्येही दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. लवकरच त्याचे संघात पुनरागमन होईल अशी चाहत्यांसह संघालाही अपेक्षा आहे. याच दरम्यान न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बॉन्ड याने मोठं विधान केलं आहे.
आयपीएलचा 18 वा हंगाम 22 मार्च पासून सुरू होणार आहे. या हंगामात मुंबईकडून जसप्रीत बुमराह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तसेच जसप्रीत बुमराहचे चाहते सुद्धा त्याच्या गोलंदाजीचे जलवे पाहण्यासाठी सज्ज आहेत. परंतु त्याच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. पाठीला झालेल्या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्यानंतर त्याने अद्याप एकही सामना खेळला नाही. याच दरम्यान न्यूझीलंडचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज शेन बॉन्डनं जसप्रीत बुमराहच्या दुखापती संदर्भात वक्तव्य केलं आहे.
ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जर त्याच जागी पुन्हा दुखापत झाली, तर बुमराहची कारकिर्द संपूष्टात येऊ शकते. त्यामुळे आता हिंदुस्थानच्या मॅनेजमेंटने (BCCI) बुमराहवरील ताण कमी केला पाहिजे, असे मत यावेळी बॉन्डने व्यक्त केले आहे.
आगामी आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराह खेळणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु त्यानंतर लगेच इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची कसोटी मालिका होणार आहे. यावरुन बोलताना बॉन्ड म्हणाला की, बुमराह जेव्हा टी-20 खेळून लगेच कसोटी क्रिकेट खेळण्यास उतरतो तेव्हा मोठी अडचण निर्माण होते. बुमराह आता तंदुरुस्त वाटत आहे. पण हे त्याच्या कामाच्या ताणावर अवलंबून आहे. क्रिकेट बोर्डाने त्याच्यावरील ताण कमी करायला पाहिजे, माझं तर हेच मत आहे. तसेच त्याला विश्रांती देण्याचा निर्णय बोर्डाने घ्यायला हवा. आयपीएलनंतर लगेचच इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणे धोक्याचे असू शकते. त्याने दोनच कसोटी सामने खेळावे, अशी चिंता बॉन्डने यावेळी बोलताना व्यक्त केली.
Comments are closed.