अभिषेक शर्मा नव्हे, शेन वॉटसन यांच्या मते हा भारतीय फलंदाज आहे अत्यंत प्रतिभावान!

माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज फलंदाज शेन वॉटसन (Shane Watson) यांनी भारतीय सलामी फलंदाज शुबमन गिलच्या सातत्यपूर्ण फलंदाजीचे कौतुक करताना म्हटलं आहे की, त्याला विविध फॉरमॅट्समध्ये जुळवून घेण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. वॉटसन यांनी गिलला अत्यंत प्रतिभावान फलंदाज असे संबोधले आहे.

जरी शुबमन गिल सध्या सर्व फॉरमॅट्समध्ये टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे, तरी सप्टेंबर 2025 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून त्याचा फॉर्म चिंताजनक राहिला आहे. त्याने गेल्या 10 डावांमध्ये 148.24 च्या स्ट्राईक रेटने केवळ 170 धावा केल्या आहेत.

सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही गिल संघर्ष करताना दिसतो आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या 3 सामन्यांत त्याने अनुक्रमे नाबाद 37, 5 आणि 15 धावा केल्या आहेत.

बुधवारी पत्रकारांशी बोलताना शेन वॉटसन यांनी सांगितले की, आधुनिक काळात खेळाडूंना सतत बदलणाऱ्या फॉरमॅट्सशी जुळवून घेणं हे एक मोठं आव्हान असतं.

त्यांच्या म्हणण्यानुसार,हे निश्चितच आव्हानात्मक आहे. पण जितका जास्त अनुभव मिळतो, तितकं तुम्हाला आपल्या तंत्रात, खेळाच्या योजनांमध्ये आणि मानसिक तयारीत प्रत्येक फॉरमॅटनुसार आवश्यक असणारे लहान-सहान बदल समजायला लागतात. हेच बदल योग्य वेळी ओळखले, तर तुम्ही प्रत्येक वेळी आपलं सर्वोत्तम प्रदर्शन देऊ शकता.

या मालिकेतील चौथा टी20 सामना ऐतिहासिक ठरणार आहे, कारण पहिल्यांदाच भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) गोल्ड कोस्टच्या कॅरारा ओव्हल मैदानावर (पूर्वीचे पीपल्स फर्स्ट स्टेडियम) भिडणार आहेत.

वॉटसन यांनी या मैदानावर होणाऱ्या मोठ्या सामन्याबद्दल उत्साह व्यक्त केला आणि म्हणाले, गोल्ड कोस्टसाठी ही एक विलक्षण संधी आहे, ज्यातून या शहराची सुंदरता जगासमोर येईल. भारतीय संघाचा येथे सामना होणं, हा गोल्ड कोस्टसाठी अभिमानाचा क्षण आहे. मला खात्री आहे की, येथे येणारे खेळाडू आणि भारतीय चाहत्यांना हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय ठरेल.

Comments are closed.