शरद पवार म्हणाले, दोन दिवसांचा दिखावा करू नका!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आवाहन गांभीर्याने घेणे गरजेचे असून त्यावर नेत्यांनी दिखावा करू नये. ताफा सोडणाऱ्यांनी दोन दिवसांचा दिखावा करू नये. एक किंवा दोन दिवसांच्या बचतीने काही होणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्री उद्यापासून रोज मंत्रालयात बाईकवरून आले तर लोक गांभीर्याने घेतील, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर कुणी गाड्यांचा ताफा कमी करतोय, तर कुणी चालत ऑफिसला जातो आहे. पण ताफा सोडणाऱ्या मंत्र्यांनी दिखावा करू नये. त्यामध्ये सातत्य दाखवावे. एका मंत्र्याने जाहीर केले आहे की, मी मंत्री आहे, पण मी कार कमी केल्या. सतरा कार होत्या त्यावरून आम्ही आठवर आलो आहोत. मंत्र्यांच्याताफ्यात 17-17 गाड्या कशाला हव्यात? गेल्या चार वर्षांपासून माझ्या ताफ्यात फक्त तीनच गाड्या आहेत. माझ्या ताफ्यात बदल करण्याची विनंती मी केली आहे, असे शरद पवार म्हणाले.
काल की परवा मी पाहिले की, सोमनाथच्या मंदिर जीर्णोद्धाराला 85 वर्षे झाली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेले होते. अनेक लोक त्या कार्यक्रमात सहभागी होते. सहा विमाने त्या ठिकाणी होती. जर तुम्ही देशाला आवाहन करत आहात तर मग त्याच्या आदल्या दिवशी सहा विमाने घेऊन त्या कार्यक्रमाला का गेला होतात? तुम्हाला काय दाखवायचे होते, असा सवाल शरद पवार यांनी केला आहे.
राहुल गांधींसदर्भात मुख्यमंत्र्यांनी वापरलेले शब्द अयोग्य
एकंदरीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणखी काळजी करावी लागेल अशी स्थिती येऊ नये म्हणून सगळ्यांनीच एकमेकांना सहकार्य करावे. मुख्यमंत्री आणि अन्य घटकांनीही आपली भाषा ही लोकांनी यात सहभागी व्हावे यासाठी पोषक असली पाहिजे. राहुल गांधींसंबंधी मुख्यमंत्र्यांनी जे शब्द वापरले ते योग्य नाहीत. राहुल गांधी हे संसदेत विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत अशा पद्धतीने बोलणे योग्य नसल्याचे शरद पवार म्हणाले.
सोने खरेदी न करण्याचा निर्णय चुकीचा नाही
सोने खरेदी करू नका हे सांगणे याचा अर्थ एकच आहे की, आपल्या करन्सीची किंमत कमी होऊ द्यायची नाही. हा निर्णय चुकीचा आहे असे वाटत नाही. खर्च कमी करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. प्रशासनात खर्च कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. लोकांचे सहकार्य ज्यात राहील त्याच्याशी सुसंगत भूमिका आणि त्यात सातत्य हे राजकारण्यांनी केले पाहिजे. कदाचित खूप टोकाला गोष्टी जातील असे वाटत नाही, पण काळजी घेतली पाहिजे असे शरद पवार म्हणाले.
निवडणुकीआधी हे गांभीर्य का दाखवले नाही?
रुपयाचे अवमूल्यन होत आहे. ते का होत आहे याचा विचार केला पाहिजे. इराणचा जो संघर्ष आहे त्याचा परिणाम होतो आहे. पण तेवढाच परिणाम आहे का? जर इराणमुळे हे घडले असेल तर निवडणुकीच्या निकालानंतर हे सगळे जाहीर का केले? निवडणूक काळात सरकारला हे गांभीर्य का आले नाही? निवडणुकीच्या काळात जनतेत ही स्थिती का सांगितली नाही, अशी विचारणा शरद पवार यांनी केली.
Comments are closed.