दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुटलेली राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका होत असून, येत्या दोन दिवसांत एकत्रित लढण्याबाबत मी स्वतः यावर खुलासा करेन, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. दोन दिवसांत याबाबत घोषणा केली जाणार असल्याचे पदाधिकाऱयांनी जाहीर केले आहे.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप विरोधात ताकद एककटण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेसचे निरीक्षक, माजी मंत्री सतेज पाटील यांच्याशी पुणे महापालिकेत आघाडी म्हणून एकत्र लढण्याबाबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
आजच्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसोबतही निवडणूक लढण्यावर अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. मित्रपक्षांच्या प्रमुखांशी स्वतंत्रपणे चर्चा केली जाणार असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले. निवडणूक चिन्हांबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल.
आज भूमिका जाहीर करणार
पुणे महापालिका निवडणुकीबाबतचा प्रस्ताव खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे दिला आहे. त्यावर पुण्यात बुधवारी सकाळी पक्षाची बैठक होऊन प्रस्तावावर चर्चा होईल. सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर निर्णय जाहीर करेन असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.
गुरुवारी किंवा शुक्रवारी घोषणा
दोन्ही पक्षांच्या नेत्यांची रात्री बैठक झाली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढण्याबाबत ठरकिले आहे. जागावाटपात दोन-दोन पावले आम्ही मागे घेणार आहोत. त्या अनुषंगाने पक्षाची तयारीही झाली आहे. किंबहुना येत्या 25 किंवा 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती जाहीर होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली आहे.
कोणाकडे कोणती जबाबदारी?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुंबईची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्याकडे, तर पुण्याची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे आणि पिंपरी-चिंचवडची जबाबदारी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपविली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने 29 महानगरपालिका निकडणूक प्रभारींची यादीच जाहीर केली आहे.
शशिकांत शिंदे म्हणतात, ही कार्यकर्त्यांची इच्छा
पुणे आणि पिंपरी-चिंचवडला मी बैठका घेतल्या. या बैठकीत पक्षातील बऱयाच पदाधिकाऱयांनी अजित पवार गटासोबत आघाडी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासंदर्भात पदाधिकाऱयांसोबत प्राथमिक चर्चा झाली असून आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही अशाप्रकारे निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले.
Comments are closed.