शरद पवार, विनोद तावडे यांच्यासह सातजण राज्यसभेवर बिनविरोध, शिंदे गटाने शेवाळे, कीर्तिकर, अडसूळ यांना डावलले
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उर्वरित सहा जागांसाठी महायुतीकडून भाजपच्या विनोद तावडे, माया इवनाते, रामराव वडकुते, रामदास आठवले यांनी तर अजित पवार गटाकडून पार्थ पवार आणि शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांनी अर्ज दाखल केले. सात जागांसाठी सातच उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाने माजी खासदार राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ यांना डावलत ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी दिली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार यांनी निवडणूक अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहता उमेदवारी अर्ज दाखल केला. शरद पवार यांचे प्रस्तावक जयंत पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांच्या विधान भवनातील कार्यालयात सादर केला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना विधिमंडळ गटनेते भास्कर जाधव, कॉँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते.
शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे
शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ आदी उपस्थित होते.
शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली शपथ
प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालात हजर राहू शकले नाहीत. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना घटनेच्या ‘कलम 84 अ’प्रमाणे विहीत नमुन्यात शपथपत्र सादर करण अनिवार्य असते. जे. जे. रुग्णालयाचे अधीक्षक संजय सुरासे यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची शपथ घेतली.
शिंदे गटात धुसफुस
माजी खासदार राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ शिंदे गटाकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना डावलत ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आल्याने शिंदे गटात धुसफुस सुरू झाली आहे. वरिष्ठांच्या मनात होतं ते झालं, त्यावर आता काय बोलणार, अशा शब्दांत अडसूळ यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. मला राज्यपाल करण्याचे आश्वासन दिले होते. त्याला आता दोन वर्षे लोटली. या कालावधीत दहा राज्यपाल झाले, पण माझा नंबर अद्याप लागला नाही. राज्यपाल पद नाही, किमान राज्यसभा द्या अशी मागणी केली होती. ज्योती वाघमारे यांचे नाव ऐनवेळी कसे समोर आले कळत नाही, असे अडसूळ म्हणाले.
महाविकास आघाडीच्यावतीने शरद पवार यांनी गुरुवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन पाठिंब्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. यावेळी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.
अजित पवार गटाकडून पार्थ पवार
अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी आहे. – शरद पवार
भाजपकडून आठवले, वडकुते, माया इवनाते
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, रिपाइं नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार उपस्थित होते.
Comments are closed.