जनमत आपल्या बाजूने; निवडणूक कामाला लागा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचना

मागील विधानसभा निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघांतून साडेचार लाख मते मिळाली आहेत. याचाच अर्थ जनमत आपल्या बाजूने आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांबाबत भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. शहरात होणाऱ्या चुकीच्या कामांवर गोष्टींवर लक्ष ठेवायला हवे. जोरदार, परखड भूमिका मांडायला हवी. संघटना बळकट करून निवडणुकीसाठी कामाला लागा, लोकांमध्ये जा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिल्या.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (दि.२३) आढावा बैठक घेतली. खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझम पानसरे, प्रकाश म्हस्के, देवेंद्र तायडे, शिरीष जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. येणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पक्षांशी समन्वय साधण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीद्वारे महाविकास आघाडीची बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले.

शहरात अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्यासाठी आंदोलने होत नाहीत; पण पुण्यात होतात, असे सांगत पवार यांनी शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी संघटित पद्धतीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

शहराध्यक्ष बदलणार?

विधानसभा निवडणुकीनंतर तिन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पराभवानंतर शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी राजीनामा दिला होता. पक्षनेतृत्वाने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. मात्र, आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षात चैतन्य आणण्यासाठी माजी महापौर आझम पानसरे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवावी, अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे शहराध्यक्ष बदलणार की कामठे कायम राहणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Comments are closed.