India Pakistan Ceasefire : शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल, हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं – शरद पवार

शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल, हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे, हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.
X वर एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “हिंदुस्थानने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ऑपरेशन सिंदूरद्वारे हिंदुस्थनने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती.”
पवार म्हणाले, “पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोड्यांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणं ही हिंदुस्थानची जबाबदारी आहे आणि हिंदुस्थानने ती जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे.” ते म्हणाले, हिंदुस्थान हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे. मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे.”
Comments are closed.