व्हीव्हीपॅट प्रणालीद्वारे मतदान झाल्यास शंका राहणार नाही, शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचे कान टोचले

व्हीव्हीपॅट प्रणालीद्वारे मतदान झाल्यास शंका राहणार नाही. मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी ही प्रणाली अधिक पारदर्शक आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचे कान टोचले. अकोल्यात पत्रकारांशी संवाद ते असे म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. आरक्षण आवश्यक आहेच, मात्र समाजात कटूता व दुरावा नको.” ते म्हणाले, कृषी क्षेत्राची परिस्थिती आज बदलली आहे. लोकसंख्या जास्त होत असताना शेती कमी होत आहे. विकास कामांसाठी शेतीची जमीन घेतली जाते. दिवसेंदिवस जमीन कमी-कमी होत आहे. त्यातून शेतीवर बोजा वाढला. तो बोजा कमी करण्याची गरज आहे. घरातील दोनपैकी एका मुलाने शेतकरी केली पाहिजे. उत्पादन व खर्चाचा विचार होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, हीच शासनाची भूमिका असावी अशी अपेक्षा व्यक्त करत कर्जमाफीबद्दल घोषणा प्रत्यक्ष कृती नाही, अशी खंत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
शरद पवार म्हणाले की, तसेच, गेल्या तीन वर्षापासून कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाचा अभ्यास करीत आहे. एआय तंत्रज्ञानातून कृषी समस्यावर तोडगा काढू शकतो. एआय तंत्रज्ञानातून केळीचे अद्भूत उत्पादन घेता येते. ऊसामध्ये हे तंत्रज्ञान वापरले. पिकांमध्ये मोठी सुधारणा झाली. महाराष्ट्रात सुदैवाने चार कृषी विद्यापीठे आहेत. कापूस, सोयाबीनसाठी एआय तंत्रज्ञान वापरावे. त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. कष्टकरी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व अर्थसहाय्य देण्याची गरज आहे. सेंद्रिय शेतीतून मिळणारे उत्पादन महत्वाचे आहे. उत्पादन खर्च व बाजारातून मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ साधता येण्याची गरज आहे. असेही यावेळी बोलताना शरद पवार यांनी सांगितले.

Comments are closed.