देवाभाऊ, नेपाळमध्ये काय घडलं पहा आणि शहाणे व्हा! शरद पवारांचा सल्ला

हिंदुस्थानच्या आजुबाजूला काय घडतंय, नेपाळमध्ये काय घडलं ते बघा. तेथे राज्यकर्ते गेले आणि भगिनीच्या हाती सत्ता आली, यातून देवाभाऊ आणि त्यांच्या सहकाऱयांनी शहाणपणा शिकण्याचं काम करावं, असा सल्ला देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारची कानउघाडणी केली.

नाशिकमध्ये सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा आक्रोश मोर्चा निघाला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत उघडय़ा जीपमध्ये बसून सवा तास शरद पवार या मोर्चात सहभागी झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपस्थित शेतकऱ्यांसमोर ते बोलत होते. शेतकऱ्यांवर दुष्काळ, अतिवृष्टीची संकटे कोसळत आहेत. या वर्षी राज्यात बहुतांश भागात ओला दुष्काळ पडला आहे. शेतकरी संकटात सापडला आहे, यावर मार्ग काढण्याची जबाबदारी ही केंद्र आणि राज्य सरकारची असते. मात्र ते ढुंकूनही बघायला तयार नाहीत. राज्यात दोन महिन्यांत दोन हजारपेक्षा अधिक शेतकऱयांनी आत्महत्या केली. शेतकरी जीव का देतो याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. नाशिकचा कांदा जगभर जातो. पण आज केंद्र सरकारने निर्यातीला बंदी आणली आहे आणि इथेही कांद्याला ते भाव देत नाहीत. अशा स्थितीत शेतकऱयांनी करायचं काय? राज्यकर्त्याला शेतकऱयाचं दुःख समजत नाही आणि आपण जर बघ्याची भूमिका घेत बसलो तर दोन हजार शेतकरी आत्महत्येचा हा आकडा लाखात जाईल आणि शेतकऱयांचे संसार उद्ध्वस्त होतील, असे ते म्हणाले.

देवाभाऊंना माझी विनंती आहे, हिंदुस्थानच्या आजुबाजूला काय घडतंय ते बघा. नेपाळमध्ये गेल्या आठ दिवसात काय घडलं? राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली, तिच्या हातात कारभार दिला गेला. आणखी काय झालं, मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. यातून शहाणपणा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील, अशी अपेक्षा करतो, असे सांगून त्यांनी सत्ताधाऱयांची कानउघाडणी केली. महिनाभरात प्रश्न सुटले नाहीत तर तयार राहा, असे आवाहन उपस्थित शेतकऱयांच्या समुदायाला करून सरकारला त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला. या वेळी माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहीत पवार, खासदार भास्कर भगरे, नीलेश लंके यांचीही भाषणे झाली. याप्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, सुरेश म्हात्रे हजर होते.

शिवाजी महाराजांचे होर्डिंग लावता, आदर्शही घ्या

मुख्यमंत्री फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेत असलेले होर्डिंग राज्यभर लावण्यात आले आहेत. याबाबत पवार म्हणाले, देवाभाऊंनी मोठमोठे होर्डिंग लावले. ते शिवाजी महाराजांचा आदर्श घेतील असे वाटले होते. महाराजांनी शेतकऱ्यांना नांगराचा फाळ बसविण्यासाठी सोनं दिलं. सोन्याच्या फाळाने शेतीची नांगरणी केली. हा बळीराजा उपाशी राहिला तर देश उद्ध्वस्त होईल, हा संदेश दिला. पण फडणवीस बळीराजाकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत, असा टोला त्यांनी फडणवीस यांना हाणला.

…तर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही – सुप्रिया सुळे

मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा. जर एका महिन्यात न्याय मिळाला नाही, तर मंत्र्यांना महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

Comments are closed.