शरद पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट.
समवेत खासदार सुप्रिया सुळे, चर्चेसंबंधी उत्सुकता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इतर विरोधी पक्ष नीट परीक्षेसंबंधीच्या आंदोलनात गुंतले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेस (शप) या पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत घेतली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पुन्हा दिल्लीत उलटसुलट चर्चांना प्रारंभ झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्या स्वागतासाठी आपल्या कार्यालयाच्या दरवाजापर्यंत आले. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही भेट पार पडली. दोन्ही नेते हास्यविनोद करतानाही दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि जलसिंचनासंबंधीचे एक निवेदन सुपूर्द केले, अशी माहिती देण्यात आली आहे.
राजकीय तर्कांना ऊत
नीट परीक्षेसंबंधीच्या आंदोलनाने सध्या वातावरण तापले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीचे वेगवेगळे अर्थ राजकीय वर्तुळात काढण्यात येत आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा होत आहे. यासंबंधी भारतीय जनता पक्ष महत्वाची भूमिका साकारत आहे, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. त्यासंबंधी चर्चा झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात एक स्थान देण्याची भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र झाल्यास आणि त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला समर्थन दिल्यास या आघाडीचे संसदेतील सामर्थ्य आणखी वाढणार आहे. त्यामुळे नेमके काय होणार, याविषयी सध्या अधिकृत माहिती नसली, तरी चर्चांना बळ मात्र मिळाले आहे.
संसदेत बळ वाढण्याची आवश्यकता
राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर आता बहुमतची समस्या नसली, तरी लोकसभा मतदारसंघांचे परिसीमन करण्यासाठी घटनापरिवर्तन करणे आवश्यक आहे. याकरीता संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन तृतीयांश बहुमत केंद्र सरकारपाशी असावे लागणार आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये तृणमूल काँग्रेसचे 20 तर उबाठा शिवसेनेचे 6 खासदार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला समर्थन दिल्याने यापूर्वीच आघाडीचे बळ वाढले आहे. आम आदमी पक्षाच्या सात राज्यसभा सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने, तसेच तृणमूल काँग्रेसच्या चार राज्यसभा सदस्यांनी पक्षत्याग करुन भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राज्यसभेतही सत्ताधारी आघाडीचे बळ वाढले आहे. द्रमुकचे 22 लोकसभा सदस्य सत्ताधारी आघाडीला साहाय्य करतील अशी शक्यता आहे. अशा स्थितीत शरद पवार यांची ही भेट राजकीय वातावरण अधिकच तापविणारी ठरली आहे.
Comments are closed.